जागतिक परिचारिका दिनाच्या महापौरांनी दिल्या शुभेच्छा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नर्सेस-सिस्टरच्या त्याग, समर्पणाविषयी कौतुकोद्‌गार

मुंबई प्रतिनिधी : कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंध बाजुला ठेवून, जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या हजारो परिचारिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.तुमच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा. तुमचे हे योगदान जग कदापीही विसरणार नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी रुग्णसेवेत अथक परिश्रम घेणाऱ्या परिचारिकांविषयी कौतुकोद्‌गार काढले आहेत.

       नर्सेस-सिस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिचारिका-रुग्णसेविका कोविड योद्ध्या आहेत. त्या कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत आघाडीवर राहून, रुग्णसेवेत मेहनत घेत आहेत. आपले घर, कुटुंब यांची जबाबदारी सांभाळत, त्यांनी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या खांद्याला-खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना विषाणूशी लढण्याचे बळ मिळाले आहे. कित्येकांना बरे होऊन आपल्या कुटुंबात परतता आले आहेत. या योगदानाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.

मुंबई मॉडेलमध्ये परिचारिकांच्या सातत्यपूर्ण सेवेचा सिंहाचा वाटा - महापौर किशोरी पेडणेकर 

     संपूर्ण देशभरात कोरोना नियंत्रणाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी ज्या "मुंबई मॉडेलचा" आज जो गौरव होत आहे, त्या गौरवामध्ये परिचारिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.१२ मे हा  फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येत असून या दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण  रुग्णालयाच्या परिचारिका वस्तीगृहात आज दिनांक १२ मे २०२१ रोजी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी परिचारिकांना संबोधित करताना महापौर बोलत होत्या.

       याप्रसंगी आरोग्य समिती अध्यक्षा श्रीमती राजुल पटेल, नगरसेवक श्री. मंगेश सातमकर,  लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, डॉ. इंगळे तसेच परिचारिका उपस्थित होत्या. महापौर किशोरी पेडणेकर परिचारिकांना संबोधित करताना पुढे म्हणाल्या की, आपले कुटुंब सांभाळून  रुग्णालयामध्ये सर्वांची काळजी घेणारी ती म्हणजे आपली परिचारिका . परिचारिका  अभ्यासक्रमातच आपल्याला सेवेचे बाळकडू मिळाले असते. रुग्णालयात दाखल रुग्ण अनेक व्याधींनी ग्रस्त असल्यानंतरही परिचारिका आपल्या प्रेमळ संवादामुळे त्याच्या मनावरील ताण हलका करण्याचा प्रयत्न करीत असते. रुग्णालयात काम करीत असताना अनेक अडचणींवर आपण मात करून आपले सेवाव्रत अखंडपणे चालू ठेवलेले असते. प्रत्यक्ष युद्धातील जखमी सैनिकांच्या सेवेत आपल्या भगिनींसह सहभागी झालेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कर्तुत्वाला नमन करण्याचा आजचा हा दिवस आहे. स्वतःची लहान मुले, कुटुंबियांची माया दूर सारून कोरोनाच्या काळात आमच्या परिचारिका भगिनी आज काम करीत आहेत. गोड संवादाने रुग्णांना धीर देऊन मनस्वास्थ्य टिकविण्याचे मोलाचे कार्य आमच्या परिचारिका भगिनी करीत असल्याचे महापौरांनी सांगितले.आपला युनिफॉर्म आदर्श मानून परिचारिका भगिनी आपले काम करीत असून या संकट काळात खचून न जाता, आपले आरोग्य सांभाळून आपले काम सुरू ठेवावे, असा मौलिक सल्ला महापौरांनी यावेळी दिला. आपल्या या सातत्यपूर्ण सेवा कार्यामुळेच बृहन्मुंबई महानगरपालिकेला एक वेगळी सन्मानाची उंची प्राप्त झाली असल्याचे महापौरांनी सांगितले.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८