कोविड आपत्तीत पालक बळी पडल्याने अनाथ झालेल्या बालकांसाठी

महिला व बाल विकास विभागाचा मुंबई जिल्हास्तरीय कृती दल - जिल्हाधिकारी राजीव निवतकर

नागरिकांना संपर्काचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी : कोविड-19 या महामारीच्या कालावधीमध्ये पालक मृत्यूमुखी पडले आहेत अशी बालके तसेच दोन्ही पालक रुग्णालयामध्ये दाखल असल्याने देखभाल होऊ शकत नाही अशा बालकांच्या मदतीसाठी राज्य शासनाने जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. नागरिकांना अशी संकटग्रस्त बालके आढळून आल्यास अथवा त्याबाबतची माहिती मिळाल्यास चाईल्डलाईन हेल्पलाइन, मुंबई शहर जिल्हा बाल संरक्षण कक्ष अथवा बाल कल्याण समितीच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा मुंबई शहर जिल्हास्तरीय कृती दलाचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी केले आहे. बालकांबाबत माहिती देण्यासाठी 24 तास कार्यरत चाईल्डलाईन हेल्पलाइन १०९८ जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मुंबई शहर ०२२-२४९२२४८४, बाल कल्याण समिती, मुंबई शहर १ व २ - ९३२४५५३९७२, ९८६७७२८९९४ या क्रमांकावर संर्पक साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

         यासंदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे एक बैठक जिल्हाधिकारी निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, या बालकांना संपूर्ण संरक्षण, संगोपन, कायदेशीर हक्क व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलाची आहे. त्यासाठी सर्व संबंधितांनी सतर्कतेने आणि संवेदनशीलरित्या काम करावे. कोविड रुग्णांना दाखल करून घेताना प्रवेश अर्जावर (ॲडमिट फॉर्म) त्यांच्या मुलांबाबत सविस्तर माहिती भरून घ्यावी. अशा घटना यापूर्वी घडल्या असतील तर त्याबाबतही माहिती जमा करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीस समितीचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांचे प्रतिनिधी, सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जे. जे. रुग्णालय तसेच मनपा आरोग्य सेवा, बाल कल्याण समिती मुंबई शहर 1 व 2 चे अध्यक्ष, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८