एच पश्चिम विभाग कार्यालय हे नवीन प्रशस्त इमारतीत स्थानांतरित

पूर्वीच्या जागेपेक्षा ६ पट मोठ्या जागेत उभारले सुविधापूर्ण भव्य कार्यालय

मोठ्या क्षमतेचे वाहनतळ, प्रेक्षागृह, सभागृह, उपहारगृह इत्यादी सुविधांनी सुसज्ज

 मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाचे प्रशासकीय कार्यालय हे वांद्रे (पश्चिम) परिसरातील सेंट मार्टिन्स मार्गावर होते. हे कार्यालय आता खार (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळील दुस-या हसनाबाद लेनमधील महानगरपालिकेच्या प्रशस्त जागेत उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीत नुकतेच स्थानांतरित झाले आहे. आधीचे कार्यालय हे केवळ ८,८८० चौरस फुटांच्या जागेमध्ये असणा-या ३ मजली इमारतीत होते. यामुळे अनेकदा नागरिकांना, अभ्यागतांना व पालिका कर्मचा-यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र, आता नव्याने बांधण्यात आलेली ६ मजली ही इमारत ही आधीच्या तुलनेत ६ पटींपेक्षा अधिक मोठ्या जागेत उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रशस्त व भव्य इमारतीमध्ये अधिक क्षमतेचे वाहनतळ, अत्याधुनिक नागरी सुविधा केंद्र, अभ्यागत कक्ष, सभागृह, प्रेक्षागृह, उपहारगृह, सुविधापूर्ण प्रसाधनगृहे इत्यादी बाबींचा समावेश आहे, अशी माहिती ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त  विनायक विसपुते यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाचे प्रशासकीय कार्यालय नुकतेच नवीन जागेत स्थानांतरित झाले आहे. या कार्यालयाबद्दल व तेथील सोयी-सुविधांबद्दल महत्त्वाचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणेः-

१. जुने कार्यालय हे ८,८८० चौरस फुटांच्या जागेत होते. नवीन कार्यालय हे तब्बल ५९ हजार फुटांपेक्षा मोठ्या जागेत उभारण्यात आले आहे. तर जुन्या इमारत ही ३ मजल्यांची (G + 2) होती. मात्र, आता नवीन इमारत ही ६ मजल्यांची (G + 5) आहे. या व्यतिरिक्त नवीन इमारतीमध्ये १ तळघर देखील आहे.

२. नवीन इमारतीचे आरेखन (Design) हे कार्यालयात येणारे अभ्यागत, नागरिक तसेच महापालिका कर्मचारी यांच्या आवश्यकतांचा विचार करुन करण्यात आले असून त्यानुसारच बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे कार्यालयाची नवीन इमारत ही अधिक सुविधापूर्ण, भव्य व प्रशस्त आहे.  

४. या नव्या कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राचे (Citizen Facilitation Centre) महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

५. पूर्वीच्या ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या जागेत असणा-या वाहनतळाची क्षमता ही केवळ ४ वाहनांची होती. यामुळे कार्यालयात येणा-या नागरिकांना, तसेच कामानिमित्त येणा-या मान्यवर लोकप्रतिनिधींना आणि महानगरपालिका अधिका-यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र, आता नवीन कार्यालयात तब्बल १०७ क्षमतेचे वाहनतळ उपलब्ध आहे.

६. नवीन कार्यालय इमारतीत विविध कारणांसाठी येणा-या अभ्यागतांसाठी -- मदत-कक्ष (Help Desk) कार्यान्वित करण्यात आला असून, यासोबतच अभ्यागत कक्ष सुविधाही उपलब्ध आहे. त्याचबरोबर अभ्यागतांसाठी वाहनतळ सुविधा देखील आहे. तसेच उपहारगृह, पिण्याचे पाणी, शौचालय इत्यादी सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे

७. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांच्या गरजा लक्षात घेऊन येथे बैठक, चर्चासत्र, परिषद इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी या नव्या इमारतीमध्ये ३ प्रशस्त सभागृह देखील उपलब्ध आहेत. तर यापैकी, १ सभागृह हे प्रेक्षागृह (Auditorium) पद्धतीचे असून तिथे एकावेळी १५० व्यक्तिंना उपस्थित राहता येईल, एवढ्या क्षमतेची आसन-व्यवस्था आहे.

८. जुन्या कार्यालयात केवळ १४ शौचकुपे असणारी ३ शौचालये उपलब्ध होती. आता नवीन इमारतीमध्ये ५५ शौचकुपे उपलब्ध आहेत. यानुसार प्रत्येक मजल्यावर स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये असण्यासह दिव्यांग व्यक्तिंसाठी देखील स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था आहे. तसेच इमारतीचे बांधकाम करताना दिव्यांग व्यक्तिंच्या गरजांचा स्वतंत्र विचार करण्यात आला आहे.

९. या इमारतीमध्ये वर्षा जल संचयन अर्थात ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ची सुयोग्य व्यवस्था देखील उभारण्यात आली आहे. या अंतर्गत इमारतीच्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी इमारतीखाली २० हजार लीटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली आहे. या पावसाच्या साठविलेल्या पाण्याचा उपयोग कार्यालयातील विविध बाबींसाठी करण्यात येणार आहे.

१०. नवीन कार्यालयात सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व मजल्यांवर तसेच परिसरात सीसीटिव्ही बसविण्यात आले असून अंतर्गत ध्वनीक्षेपण व्यवस्था देखील कार्यरत आहे. त्याचबरोबर अग्निशमन यंत्रणेसह आपत्ती व्यवस्थापन विषयक बाबींची देखील काळजी घेण्यात आली आहे. 

११. ही इमारती अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने व उर्जा बचतीच्या उद्देशाने लवकरच या ठिकाणी सौरउर्जा संच बसविण्याचे देखील प्रस्तावित करण्यात येत आहे.

१२. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयाचा नवीन पत्ता व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेः- ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालय, दुसरी हसनाबाद लेन, खार (पश्चिम), मुंबई – ४०० ०५२, दूरध्वनी क्रमांक – ०२२ – २६४४ ०१२० / २६०० ८६३६. 

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८