तलाठी संवर्गाच्या बदल्यांना 2019 च्या शासन निर्णयातून वगळण्यासाठी सकारात्मक - सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
शासकीय कर्मचाऱ्याच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशनाबाबतचा शासन निर्णय दि. 15 मे, 2019 रोजी जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयात जिल्हा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर बदलीने कायमस्वरूपी समावेशन करता येणार नाही अशी तरतूद आहे. त्यामुळे तलाठी संवर्गाची विनंती बदली जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एका उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवरून दुसऱ्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवर होत नाही. या कारणाने न्याय मिळत नसल्याची भावना तलाठी महासंघाने राज्यमंत्री भरणे यांच्याकडे व्यक्त केली. त्याची तात्काळ दखल घेऊन या शासन निर्णयातून तलाठी संवर्गाला वगळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश भरणे यांनी दिले.