डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ संपन्न

आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे स्नातकांना आवाहन

यंदा मराठीसह 5 भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होणार : डॉ अनिल सहस्रबुद्धे

मुंबई प्रतिनिधी :युवकांनी केवळ नौकरी अथवा सरकारी नौकरीच्या मागे न लागता पुस्तकी ज्ञानाला व्यावहारिक ज्ञानाची जोड द्यावी. सरकारने माझ्यासाठी काय केले असा सूर न आळवता आपण समाजासाठी काय करू शकतो हा विचार करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शुक्रवारी (दि. 25) रोजी संपन्न झाला. त्यावेळी स्नातकांना संबोधित करताना ते बोलत होते. दीक्षांत समारंभात दिला जाणारा तैत्तेरीय उपनिषदातील 'सत्यं वद, धर्म चर' हा उपदेश हे केवळ स्नातकांसाठी नसून तो अध्यापकांसह सर्वांसाठी आहे असे सांगताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांपुढे उच्च आदर्श ठेवल्यास ते त्याप्रमाणे अनुकरण करतील असे राज्यपालांनी सांगितले.

     नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मातृभाषेतून उच्च शिक्षणाचा पुरस्कार करणारे आहे याचा उल्लेख करून यावर्षी देशात मराठी, तामिळ, बंगालीसह 5 भारतीय भाषांमधून अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यादृष्टीने 14 महाविद्यालयांनी तयारी केली असल्याची माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ अनिल सहस्रबुद्धे यांनी मुख्य दीक्षांत भाषणात दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी व संशोधकांच्या नवसृजन व कल्पकतेला वाव देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.अभियांत्रिकी शिक्षण मराठी भाषेतून देण्याच्या भूमिकेचे स्वागत करताना राज्यात पॉलिटेक्निकमधून देखील मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध करण्याबाबत प्रयत्नशील आहोत. गेल्या दिड वर्षात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत गायन, मराठी भाषा दिन साजरा करणे, शिवस्वराज्य दिन साजरा करणे आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डॉ आंबेडकर यांच्या नावाला साजेसे कर्तृत्व केले पाहिजे. राष्ट्रीय सेवा  योजनेप्रमाणे एनसीसी देखील सर्व महाविद्यालयांमध्ये सुरु करावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

       विद्यापीठाचा अहवाल सादर करताना कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी विद्यापीठाने करोना संसर्ग काळात औरंगाबाद तसेच उस्मानाबाद केंद्रात करोना चाचणी केंद्र सुरु करून त्याद्वारे 2.5 लाख रुग्णांची चाचणी केल्याचे सांगितले. विद्यापीठाने मुख्यमंत्री सहायता निधीला 81 लाख रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले. दीक्षांत समारोहात ८१७३६ स्नातकांना पदवी, पदविका, प्रमाणपत्रे तसेच पीएच डी प्रदान करण्यात आल्या.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८