"वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन" ने महापौरांना सन्मानित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यथोचित गौरव ..
मुंबई प्रतिनिधी :कोरोना काळात मुंबईकर नागरिकांच्या सातत्यपूर्ण आरोग्यसेवेबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना " वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन " ने नुकतेच सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज सोमवार दि. २१ जून २०२१ रोजी सत्कार करण्यात आला. मुंबईच्या विकासाचे असे धडाडीचे काम यापुढेही आपण असेच चालू ठेवावे. तसेच मुंबईकर नागरिकांची आपल्या हातून अशीच सेवा घडत राहो, अश्या शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना यावेळी दिल्या. याप्रसंगी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे,खासदार राहुल शेवाळे, उप महापौर अँड.सुहास वाडकर, सभागृह नेते विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते.
"वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन" चे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन नुकतेच सन्मानित केले होते. एक महिला व युवतींचे नेतृत्व करणाऱ्या महिला महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांचा आम्हाला अभिमान असून सर्वच महिला वर्गांसाठी त्या प्रेरणास्त्रोत असल्याचे फराह सुलतान अहमद यांनी त्यावेळी सत्कारप्रसंगी कौतुक केले होते. कोरोना काळात त्यांच्या कामाची धडाडी व उत्साह हा आम्हाला प्रेरणा देणारा असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच आम्ही सन्मानित केले असल्याचे त्यांनी सांगितले होते.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८