टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही !
महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे केवळ आयुक्तच नव्हे तर आपले फिलासॉफर,गाईड, फ्रेन्ड आहेत. त्यांच्या मुळेच आपण कोविडच्या पहिल्या व दुस-या लाटेला समर्थपणे तोंड देवू शकलो, असे उद्गार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात काढले. भिती न बाळगता काम केल्याबाबत टाटा आमंत्रातील कर्मचारी वर्गाचे आणि त्यांना काम करण्यासाठी पाठिंबा देणा-या त्यांच्या कुटूंबियांचे कौतुक देखील त्यांनी आपल्या भाषणात केले. आम्ही येथे निरोप समारंभासाठी आलेलो नसून कोविड कालावधित येथे काम केलेल्या कर्मचारी वर्गाचे आभार मानायला आलेलो आहोत, असेही पुढे ते म्हणाले. कोविडच्या पहिल्या लाटेत टाटा आमंत्रा सुरु करतांना अनंत अडचणींना तोंड दयावे लागले, सुरुवातीला तेथे काहीही सुविधा नव्हत्या, काम करण्याकरीता येण्यास माणसे घाबरत होती. अशा परिस्थितीत अडचणीतून मार्ग काढत काम सुरु ठेवले आणि टाटा आमंत्रा हे महाराष्ट्रातील एक उत्तम क्वारंटाईन सेंटर म्हणून वाखाणले गेल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.
टाटा आमंत्रात कामासाठी आलो आणि हे कुटूंब मिळालं, पॅन्डॅमिकने सर्वांना नात्यांची जाणीव करुन दिली, असे उद्गार टाटा आमंत्रात काम करणा-या वैदयकीय अधिकारी डॉ. वैभव यांनी आपल्या भाषणात काढले. टाटा आमंत्रामध्ये आतापर्यंत 40 हजार कोविड रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. त्याचप्रमाणे टाटा आमंत्रात संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी जलनि:सारण, पाणी पुरवठा, केटरिंग सुविधा पुरविण्यासाठी अनेकांचा मोलाचा हातभार लागला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.या समयी उपायुक्त रामदास कोकरे,उपायुक्त सुधाकर जगताप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव,साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पानपाटील,डॉ. सरवणकर,कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.