कोविड आजाराचे वैद्यकीय व्यवस्थापन' या विषयावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पुस्तक हे आपल्याला व जगाला संकटातून बाहेर पडण्याची दिशा देणारे - मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे
मुंबई प्रतिनिधी : कोविड आजार व त्याचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि निगडित अनुभव" या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रकाशित केलेले ६५० पानांचे पुस्तक हे आपणाला व जगाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी केले. "कोविड आजार व त्याचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि निगडित अनुभव" या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज दि. ११ जून २०२१ रोजी करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उप महापौर अँड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, प्रधान सचिव. विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड , अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर तसेच या पुस्तकाचे संपादक लोकमान्य टिळक महापालिका सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी, महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल, मज्जातंतू शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. आलोक शर्मा आदी वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, या पुस्तकाच्या वजनाबरोबरच यातील माहितीही तोलामोलाची आहे. शंभर वर्षापूर्वी आलेल्या संकटात लाखांच्या घरात अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी काय उपाययोजना केल्या होत्या, याची माहिती आज उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता आज अशा संदर्भ ग्रंथांची निर्मिती होणे गरजेचे आहे.याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री महोदय पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने कोरोनाचा मृत्युदर अजिबात लपवलेला नसून आणि लपू देणार नाही. आपल्याला उपचार पाहिजे असेल, तर सत्याला सामोरे गेले पाहिजे. कोरोना मुक्त गाव ही चळवळ आपण राबवित असून भविष्यात या पुस्तकाच्या आतील पाने वाढू नये, ही प्रार्थना आहे. जगभरात कोणी अशा प्रकारचे' डॉक्युमेंटेशन' केले असेल, तर माहीत नाही परंतु आपले पुस्तक हे माहितीची नवीन मार्गदर्शिका आहे.अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. 'कोविड १९' ही जगातील सर्वात मोठी आरोग्याची समस्या आहे. कारण सध्याच्या वैद्यकीय पाठ्यपुस्तकांमध्ये या आजाराबद्दल काहीही उल्लेख नाही.या पुस्तकात कोविड १९ च्या वैद्यकीय व्यवस्थापनाविषयी समग्र माहिती एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. जेणेकरून वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि वैद्यकीय व्यावसायिकांना हा आजार समजून घेण्यासाठी व उपचार करण्यासाठी एक विश्वसनीय संदर्भस्रोत मिळू शकेल.
या पुस्तकातील लेख महापालिकेच्या ज्येष्ठ वैद्यकीय शिक्षकांनी लिहिले आहेत. त्या सर्वांचा कोविड रुग्णाच्या व्यवस्थापनातील मोलाचा अनुभव आहे. त्यातील सर्व माहिती उत्तम प्रकारे संदर्भित आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणीकृत आहे. पुस्तकामध्ये सर्वसामान्य आढावा, वैज्ञानिक दृष्टिकोन, रोगनिदान विषयक पैलु ,उपचार व व्यवस्थापन विशेष सहाय्यक पैलू,अद्यावत संशोधन आणि नूतन उपचार प्रणाली असे सहा विभाग करण्यात आले आहे. 'कोविड १९' या सर्व बाबींचा समावेश करणारे हे एक व्यापक पुस्तक आहे.या पुस्तकात 'कोविड १९' या आजाराच्या वैद्यकीय व्यवस्थापनाची तसेच महामारीच्या योग्य नियोजनासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांची आणि यासाठी चालविण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधांची माहिती दिली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुभसंदेश तर महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आज प्रकाशित झालेल्या संदर्भ ग्रंथाच्या प्रती भारतातील सर्व महत्त्वाच्या वैद्यकीय महाविद्यालयांना व वैद्यकीय संशोधन केंद्रांना पाठविण्यात येणार आहेत. तसेच लवकरच हे पुस्तक किंडल वर देखील उपलब्ध असणार आहे, अशी माहिती यानिमित्ताने शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली आहे.