आरक्षित भूखंडावर अतिक्रमण होऊ नये यासाठी वृक्षारोपण करण्यात आले ?

आरक्षित भूखंडावर,सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने आज आंबिवली आणि टिटवाळा परिसरात   आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते वृक्षारोपण !  

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रात संपादित केलेल्या आरक्षित भूखंडा सभोवताली वृक्ष लागवड करुन सदर भूखंड संरक्षित करावेत तसेच त्या भूखंडांचा विकास होईपर्यंत ते भूखंड मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच महापालिकेच्या सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेने संपादित केलेल्या भूखंडावर वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे, या महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाना बरोबरच मॉर्निंग वॉक ग्रुप कल्याण, कल्याण रनर्स ग्रुप, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, कल्याण जनता सहकारी बँक, कुणबी समाज प्रतिष्ठान, आय नेचर फाऊंडेशन, इनरव्हिल क्लब,डोंबिवली पूर्व यांनी देखील महापालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेण्यासाठी सहमती दर्शविली आहे.

    या मोहिमेचा एक भाग म्हणून आज सकाळी अ प्रभाग क्षेत्र परिसरातील स्वराज्य नेपच्यून, आंबिवली पश्चिम व थारवानी प्रोजेक्ट, टिटवाळा या परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने राबविल्या जाणा-या वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या मैदानावर मुलांना खेळण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल तसेच नागरिकांना देखील फेरफटका मारण्यासाठी या मैदानाचा उपयोग होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. यासमयी विभागीय उपआयुक्त अर्चना दिवे, महापालिका सचिव तथा मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, अ प्रभागक्षेञ अधिकारी राजेश सावंत, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे त्याचप्रमाणे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे संदिप भंडारी हे उपस्थित होते. यावेळी करंजा, सिताफळ, चिंच, कोकम,शिरीष या देशी झाडांची लागवड करण्यात आली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८