आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करु या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ब्रॉडगेजवरील 300 कोटींच्या उड्डाणपुलांचेही भूमीपूजन
नागपूर प्रतिनिधी : महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीत काही रस्ते-रेल्वे मार्ग नादुरुस्त झाले आहेत. ते दुरुस्त करताना तसेच नवे रस्ते करताना अनेक पिढ्यांसाठी टिकतील अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. यासाठी राज्य व केंद्र सरकार समन्वयातून काम करेल. देशभर उच्च दर्जाच्या महामार्गाच्या निर्मितीचे कार्य रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी करीत आहेत. या परिस्थितीत त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग राज्याच्या दर्जात्मक रस्ते निर्मितीसाठी होईल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नागपूर-नागभीड रेल्वे मार्गावरील कोट्यवधीच्या महत्वाकांक्षी उड्डाण पुलांच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. उत्तर नागपूरमधील वाहतुकीची कोंडी कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी कडबी चौक ते गोळीबार चौक दरम्यानच्या जवळपास तीन किलोमीटर लांबीच्या 146 कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते भूमीपूजन झाले. महाराष्ट्र राज्य रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने ( महारेल ) आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. या भूमीपूजन सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दूरस्थ प्रणालीद्वारे तसेच उर्जा तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास कुंभारे, राजू पारवे, कृष्णा खोपडे, मोहन मते, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल, जिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होते.
उत्तर नागपूर परिसरातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी मोतीबाग येथील एसईसीआर नॅरोगेज संग्रहालयासमोर महारेलमार्फत भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 146 कोटीच्या कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाच्या भूमीपूजनासोबतच या कार्यक्रमामध्ये कळमना मार्केट ते नागपूर जोड रस्ता, रेल्वे फाटक क्रमांक - 73 ( 69 कोटी ) भांडेवाडी जवळ रेल्वे फाटक क्रमांक -69 (25 कोटी ) उमरेड शहराजवळील जोडरस्ता बसस्थानकाजवळील रेल्वे फाटक क्रमांक - 34 ( 26 कोटी ) उमरेड भिवापूर बायपास रोडवरील रेल्वे फाटक क्रमांक - 33 ( 38 कोटी ) अशा एकूण 158 खर्चाच्या नागपूर इतवारी ते नागभिड रेल्वे लाईनवरील चार नवीन उड्डाणपुलांचेही भूमीपूजन करण्यात आले. 304 कोटींच्या पाचही उड्डाणपुलांचे आज प्रत्यक्ष कामही सुरु झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणात कौतुक केले. महाराष्ट्राचे तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या दर्जेदार कामाचे कौतुक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही केले होते याची आठवण सांगितली. राज्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची आठवण करुन देत सध्या कोरोनासोबतच नैसर्गिक आपत्तीशी महाराष्ट्र झुंजत आहे. तौक्ते वादळाचे, पूर अतिवृष्टीचे संकट, खचणारे रस्ते, दरडी यातून राज्य निश्चितच सावरेल. मात्र यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून अनेक पिढ्यांसाठी टिकेल अशा नवीन तंत्रज्ञानाने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
समृद्धी महामार्गामुळे राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर जवळ येत आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम दृष्टीपथात आहे. मात्र नव्या पायाभूत सुविधा उभ्या राहत असताना सामान्य नागरिकांची काळजी घेतो तशीच काळजी वन्यजीव व वन्य प्राण्यांचीही घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. नागभीड येथे ब्रॉडगेज तयार करताना ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जंगलामध्ये उन्नत मार्गाचा वापर करा. जेणेकरुन वन्यजीव, वनसंपदा यांचे नुकसान होणार नाही. निसर्ग व पर्यावरणपूरक नवतंत्रज्ञानाची जोड असलेले रस्ते हे दिर्घकालीन प्रगतीसाठी गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग नितिन गडकरी यांनी यावेळी संबोधित करताना या प्रकल्पासाठी सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. ऊर्जा मंत्री व ऊर्जा विभागाने यासाठी केलेली मदत उल्लेखनीय आहे. उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करताना या ठिकाणचे अतिक्रमण अडचण ठरणार नाही, यासाठी स्थानिक नेत्यांनी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. नागपूर ते वडसा हा ब्रॉडगेज मार्ग पूर्णत्वास जाईल. सोबतच उमरेड पुढील भिवापूर पर्यंतच्या चार पदरी रस्ते मार्गामध्ये वने व पर्यावरण विभागाच्या आक्षेपांची पूर्तता झाल्यास हा रस्ता देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असे श्री.गडकरी यांनी सांगितले. नव्या रेल्वे लाईन मुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरवताना 20 ते 22 तास याठिकाणी लागायचे. त्या ठिकाणी केवळ दोन तासांमध्ये कोळशाची सुलभ वाहतूक होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नितीन गडकरी यांनी समृद्धी महामार्गाला जालना येथून मराठवाड्याला जोडण्याचे आवाहन केले नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, विकासकामात परस्परांना सहकार्य करण्याची नागपूरची संस्कृती असून नागपूरच्या मेट्रोला हिरवी झेंडी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले. नागपूरच्या विकासासाठी आजचा कार्यक्रम अतिशय उत्तम कार्यक्रम असून यामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे मंत्रालय यांनी समन्वयातून काम केले आहे. या प्रकल्पासाठी आमदार राजू पारवे यांनी घेतलेल्या पुढाकाराचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पशुसंवर्धन व क्रीडा विकास मंत्री सुनील केदार यांनी रस्ते, रेल्वेमार्ग तयार करताना शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. स्थानिक भूमिपुत्रांना प्रकल्पाचा त्रास होता कामा नये. याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनीही यावेळी संबोधित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.