पालिकेच्या एकाचा विभाग कार्यालयांतून सेवा देणार

पालिकेच्या विभाग कार्यालयांतून नागरिकांचे समाधान होईल अशी सेवा मिळावी  - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एच पश्चिम' विभाग कार्यालयाच्या नव्या भव्य वास्तूचे लोकार्पण

पूर्वीच्या जागेपेक्षा ६ पट मोठ्या जागेत उभारलेल्या सुविधापूर्ण भव्य विभाग कार्यालयात व्यायाम शाळेसह मोठ्या क्षमतेचे वाहनतळ, प्रेक्षागृह, सभागृह, उपहारगृह इत्यादी सुविधा

मुंबई प्रतिनिधी : महानगरपालिका, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी आपापली कामे घेऊन येणारे नागरिक जरी कधी कपाळावर आठी घेऊन येत असले, तरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असायला हवे. तरच आपल्या कामांचे आणि प्रयत्नांचे सार्थक झाले असे म्हणता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एच पश्चिम' विभागाच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण प्रसंगी  ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड्.अनिल परब, पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

      महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी 'कोविड'मध्ये नागरिकांची अव्याहतपणे सेवा करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार - कर्मचारी -डॉक्टर - वैद्यकीय कर्मचारी व अधिकारी यांचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. अव्याहतपणे कार्यरत राहणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एच पश्चिम' विभागाच्या नव्या वास्तूत आल्यानंतर आपण खरोखरच महापालिकेच्याच कार्यालयात आलो आहोत का? असा प्रश्न पडावा, इतकी ही वास्तू सुविधापूर्ण आणि प्रभावी झाली असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले की,सामान्य नागरिकांचे जन्म प्रमाणपत्रांच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांशी जन्मापासूनचे नाते असते. हे नाते आणखी दृढ होण्यास या सुविधापूर्ण कार्यालयांमुळे निश्चितच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या अव्याहत कामांमुळे आज जगभरात 'मुंबई मॉडेल'चा नावलौकिक आहे. अनेक गोष्टींची सुरुवात ही मुंबईत होते आणि मग जगभरात त्याचे अनुकरण केले जाते. आज लोकर्पित होत असलेली 'एच पश्चिम' विभाग कार्यालयाची वास्तू आणि या वास्तूतून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा या देखील अशाच अनुकरणीय ठरतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कोरोना काळात आपण सर्वजण आता आरोग्याबाबत अधिक सजग झालो आहोत, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी नव्या वास्तूमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा असल्याच्या बाबीचा आवर्जून उल्लेख केला. तसेच महापालिकेच्या वास्तूत उभारण्यात आलेली ही पहिलीच व्यायामशाळा असल्याचेही आवर्जून नमूद केले. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महापालिकेचे विभाग कार्यालय आदर्श असायलाच हवे. लोकार्पण केलेले 'एच पश्चिम' विभाग कार्यालय बघितल्यानंतर हे कार्यालय आदर्शच असल्याची प्रचिती येते. याच प्रकारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आणखी ३ विभाग कार्यालयांच्या नूतन वास्तू उभारणे आवश्यक असून यामध्ये 'जी दक्षिण' विभाग, 'आर उत्तर' विभाग आणि 'ए' विभागाचा समावेश आहे. यासाठी पर्यायी जागेत विभागाचे स्थलांतर करून हे काम महापालिका प्रशासनाने तातडीने सुरू करावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेची वरळी येथील अभियांत्रिकी संकुलाची इमारत अप्रतिम आणि नीटनेटके वास्तू आहे. त्याच प्रमाणे लोकार्पित झालेल्या 'एच पश्चिम' विभाग कार्यालयात प्रवेश केल्यानंतर नागरिकांना 'हेल्प कियॉस्क' द्वारे त्यांच्या कामाबाबत मार्गदर्शन केले जाईल. त्याचबरोबर नागरिकांना आपली 'फाईल' आणि आपल्या कामाचा 'फॉलोअप' देखील 'हेल्प कियॉस्क' द्वारे कळेल. 'हेल्प कियॉस्क' ही संकल्पना योग्य प्रकारे अमलात आणल्याबद्दल महापौर पेडणेकर यांनी 'एच पश्चिम' विभागाचे साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांचे कौतुक केले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाची वास्तू उभारताना एक मॉडेल निर्धारित करून त्या पद्धतीने इतर सर्व विभाग कार्यालयाची निर्मिती करावी, असे निर्देशही महापौर पेडणेकर यांनी दिले.

        बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांनी 'एच पश्चिम' विभागाच्या नव्या भव्य वास्तुच्या ठळक वैशिष्ट्यांची आणि या वास्तूत उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती  दिली. सूत्रसंचालन 'एच पश्चिम' विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. विनायक विसपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'एच पश्चिम' विभागाच्या नवीन सुविधापूर्ण कार्यालयाबद्दल नेटकी माहिती देणारा माहितीपट उपस्थितांना दाखविण्यात आला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाच्या नव्या भव्य वास्तूबद्दल

   बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाचे प्रशासकीय कार्यालय हे वांद्रे (पश्चिम) परिसरातील सेंट मार्टिन्स मार्गावर होते. हे कार्यालय आता खार (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळील दुस-या हसनाबाद लेनमधील महानगरपालिकेच्या प्रशस्त जागेत उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीत स्थानांतरित झाले आहे. आधीचे कार्यालय हे केवळ ८,८८० चौरस फुटांच्या जागेमध्ये असणा-या ३ मजली इमारतीत होते. यामुळे अनेकदा नागरिकांना, अभ्यागतांना व पालिका कर्मचा-यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र, आता नव्याने बांधण्यात आलेली ६ मजली ही इमारत ही आधीच्या तुलनेत ६ पटींपेक्षा अधिक मोठ्या जागेत उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रशस्त व भव्य इमारतीमध्ये अधिक क्षमतेचे वाहनतळ, अत्याधुनिक नागरी सुविधा केंद्र, अभ्यागत कक्ष, सभागृह, प्रेक्षागृह, उपहारगृह, व्यायामशाळा, सुविधापूर्ण प्रसाधनगृहे इत्यादी बाबींचा समावेश आहे, अशी माहिती ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली आहे. 

या नव्या कार्याबद्दल ठळक माहिती पुढील प्रमाणे:-

१. जुने कार्यालय हे ८,८८० चौरस फुटांच्या जागेत होते. नवीन कार्यालय हे तब्बल ५९ हजार फुटांपेक्षा मोठ्या जागेत उभारण्यात आले आहे. तर जुन्या इमारत ही ३ मजल्यांची (G + 2) होती. मात्र, आता नवीन इमारत ही ६ मजल्यांची (G + 5) आहे. या व्यतिरिक्त नवीन इमारतीमध्ये १ तळघर देखील आहे.

२. नवीन इमारतीचे आरेखन (Design) हे कार्यालयात येणारे अभ्यागत, नागरिक तसेच महापालिका कर्मचारी यांच्या आवश्यकतांचा विचार करुन करण्यात आले असून त्यानुसारच बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे कार्यालयाची नवीन इमारत ही अधिक सुविधापूर्ण, भव्य व प्रशस्त आहे.

३ . या नव्या कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राचे (Citizen Facilitation Centre) महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

४. पूर्वीच्या ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या जागेत असणा-या वाहनतळाची क्षमता ही केवळ ४ वाहनांची होती. यामुळे कार्यालयात येणा-या नागरिकांना, तसेच कामानिमित्त येणा-या मान्यवर लोकप्रतिनिधींना आणि महानगरपालिका अधिका-यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र, आता नवीन कार्यालयात तब्बल १०७ क्षमतेचे वाहनतळ उपलब्ध आहे.

५ . नवीन कार्यालय इमारतीत विविध कारणांसाठी येणा-या अभ्यागतांसाठी "मदत कक्ष" (Help Desk) कार्यान्वित करण्यात आला असून, यासोबतच अभ्यागत कक्ष सुविधाही उपलब्ध आहे. त्याचबरोबर अभ्यागतांसाठी वाहनतळ सुविधा देखील आहे. तसेच उपहारगृह, पिण्याचे पाणी, शौचालय इत्यादी सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे

६ . बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांच्या गरजा लक्षात घेऊन येथे बैठक, चर्चासत्र, परिषद इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी या नव्या इमारतीमध्ये ३ प्रशस्त सभागृह देखील उपलब्ध आहेत. तर यापैकी, १ सभागृह हे प्रेक्षागृह (Auditorium) पद्धतीचे असून तिथे एकावेळी १५० व्यक्तिंना उपस्थित राहता येईल, एवढ्या क्षमतेची आसन-व्यवस्था आहे.

७ . जुन्या कार्यालयात केवळ १४ शौचकुपे असणारी ३ शौचालये उपलब्ध होती. आता नवीन इमारतीमध्ये ५५ शौचकुपे उपलब्ध आहेत. यानुसार प्रत्येक मजल्यावर स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये असण्यासह दिव्यांग व्यक्तिंसाठी देखील स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था आहे. तसेच इमारतीचे बांधकाम करताना दिव्यांग व्यक्तिंच्या गरजांचा स्वतंत्र विचार करण्यात आला आहे.

८ . या इमारतीमध्ये वर्षा जल संचयन अर्थात ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ची सुयोग्य व्यवस्था देखील उभारण्यात आली आहे. या अंतर्गत इमारतीच्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी इमारतीखाली २० हजार लीटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली आहे. या पावसाच्या साठविलेल्या पाण्याचा उपयोग कार्यालयातील विविध बाबींसाठी करण्यात येणार आहे.

९ . कर्मचार्‍यांचे आरोग्य अधिकाधिक चांगले राहण्याची गरज लक्षात घेऊन या कार्यालयातील पाचव्या मजल्यावर कर्मचार्‍यांसाठी अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. या व्यायाम शाळेत स्वयंचलित ट्रेडमिल, सायकलिंग, वेट लिफ्टिंग आदी सुविधा आहेत.

१०. नवीन कार्यालयात सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व मजल्यांवर तसेच परिसरात सीसीटिव्ही बसविण्यात आले असून अंतर्गत ध्वनीक्षेपण व्यवस्था देखील कार्यरत आहे. त्याचबरोबर अग्निशमन यंत्रणेसह आपत्ती व्यवस्थापन विषयक बाबींची देखील काळजी घेण्यात आली आहे.

११. ही इमारती अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने व उर्जा बचतीच्या उद्देशाने लवकरच या ठिकाणी सौरउर्जा संच बसविण्याचे देखील प्रस्तावित करण्यात येत आहे.

१२. अत्याधुनिक पद्धतीची 'इ-ऑफिस' ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविता यावी, यासाठी या कार्यालयामध्ये प्रशासकीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक क्षमतेची इंटरनेट जोडणीसह संगणक सुविधा देण्यात आल्या आहेत.

१३. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालयाचा नवीन पत्ता व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेः- ‘एच पश्चिम’ विभाग कार्यालय, दुसरी हसनाबाद लेन, खार (पश्चिम), मुंबई – ४०० ०५२, दूरध्वनी क्रमांक – ०२२ – २६४४ ०१२० / २६०० ८६३६.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८