केंद्राने धान खरेदीसाठी संख्या वाढवून द्यावी

धान खरेदी केंद्राची संख्या वाढवून धान खरेदीचे योग्य व्यवस्थापन करावे - अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई प्रतिनिधी : धान खरेदी केंद्राची संख्या या हंगामात वाढवून धानखरेदी वेळेवर करा. धान खरेदी व धानभरडाई प्रक्रियेबाबत अंदाजित वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणेच प्रक्रिया पार पडेल अशी खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत धान व भरड धान्य खरेदी पूर्व नियोजनाची बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात घेतली. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग,सर्व विभागांचे पुरवठा उपायुक्त तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

      अन्न,नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले, धानाची प्रतवारी व इतर बाबींसाठी शासनस्तरावर राज्यस्तरीय भरारी पथक तयार करण्यात येणार आहे.या पथकाकडून प्रत्यक्ष स्थळी भेट देवून सर्व बाबींची तपासणी केली जाईल.या पथकाला तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास सर्व संबंधितावर कडक कारवाई  करण्यात येईल.पणन हंगाम 2020-2021 मध्ये अनेक महत्वाचे निर्णय शासनाकडून घेण्यात आले होते.ऑनलाईन सातबारा,बाहेरील राज्यातून धान येणार नाही यासाठी राज्याच्या सिमा सिल करणे,धानाची गुणवत्ता यंत्रणेमार्फत तपासून घेणे,धानापासून तयार होणाऱ्या सिएमआरचे गुणवत्ता नियंत्रणमार्फत गुणवत्ता तपासणी करून घेण्यात आले आहे.याप्रमाणेच आताही धान खरेदी करताना या निर्णयांची अंमलबजावणी केली जावी. भुजबळ म्हणाले, धान खरेदी केंद्राबाबत स्थानिक यंत्रणांनी समन्वयानी काम करावे.धान खरेदी केंद्रावर कर्मचारी,ग्रेडर,वजन काटे,धान साठवणूकीसाठी गोदामे,मॉइश्च मिटर या सर्व बाबीं उपलब्ध आहेत का याचीही तपासणीही केली जावी.फक्त नोंद असलेल्या शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी करण्यात यावे.धानखरेदी केंद्राचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी धान खरेदी केंद्राबाबत  शासन स्तरावर एक मध्यवर्ती माहिती संकलन कार्यालय करता येईल का ? याबाबत संबधित यंत्रणांनी चाचपणी करावी.धान खरेदी केंद्रावर प्रशिक्षित ग्रेडरची नेमणूक करावी.सर्व गोदांमाचेही योग्य व्यवस्थापन करण्यात यावे तसेच कोणताही शेतकरी धान नोंदणीपासून वंचित राहता कामा नये याचीही खबरदारी घेण्यात यावी अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

     अन्न,नागरी पुरवठा मंत्री  भुजबळ म्हणाले, मिलर्स सोबत करारनामे करताना त्यांना सर्व अटी व नियम यांची माहिती देण्यात यावी.जे मिलर्स केलेल्या करारनाम्यातील अटींचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मिलर्सकडून प्राप्त होणारा सिएमआरची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी प्रशिक्षित गुणवत्ता यंत्रणेची नेमणूक करण्यात यावी.याबाबत शासन व भारतीय अन्न महामंडळ यांच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजनही करण्यात यावे जेणेकरून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती संबधित कर्मचा-यांना देण्यात यावी, जेणेकरून गोदामाचे व्यवस्थापन या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल. बारदानाच्या आवश्यकतेबाबत शासन स्तरावरून माहिती संकलित करण्यात येवून प्रक्रिया लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून बारदाना व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यात येईल अशा सूचनाही श्री. भुजबळ यांनी दिल्या. भुजबळ म्हणाले, पणन हंगाम २०२०-२१ साठी ज्वारी, बाजरी, गहू, मका व रागी या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व अंदाजीत उत्पादन याबाबत योग्य माहिती घेण्यात यावी. जेणेकरून केंद्र शासनास भरडधान्याच्या बाबतीतील माहिती कळविण्यात येईल. भरडधान्याची प्रत व गुणवत्ता तपासूनच खरेदी करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. अशा सूचनाही अन्न,नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८