रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची
अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
परिवहन विभागाने अद्ययावत यंत्रणा कार्यरत केल्याचे समाधान व्यक्त करून या यंत्रणेच्या वापरातून अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि जीवितहानी रोखणे हा राज्य शासनाचा हेतू निश्चितच साध्य होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली. कारण नसतांना उगाचच वेगापायी वाहनचालक आणि सोबतींचेही प्राण जातात. अनेकदा वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. ही प्राणहानी न होता त्यांना वाचवणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी किंवा अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, देशातील रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाचे मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेले आहेत. गेल्या वर्षभरात दुदैवाने महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढले होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी वायुवेग पथकांना अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असलेली 76 वाहने उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या वाहनांच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण आणि बेशिस्त वाहतुक नियंत्रणात येईल. भविष्यात महाराष्ट्र अपघात रोखण्यात यश मिळेल. तसेच अपघाताच्या प्रमाणाबाबतीत राज्याचे स्थान खाली आणण्यासाठीही वाहनांचा उपयोग होईल, असेही परब यांनी यावेळी सांगितले. वायुवेग पथकाच्या माध्यमातून वेगवान आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करता येणार आहे.
वायुवेग पथक व वाहनांविषयी :
राज्यामध्ये वाहन तपासणीसाठी परिवहन विभागाची एकूण 92 वायुवेग पथके आहेत. राज्य रस्ता सुरक्षा निधीतून महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीची स्कॉर्पिओ S५ या मॉडेलची 76 वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्पीड गन, ब्रेथ अॅनालायझर, व टींट मीटर उपकरणे, इंटिग्रेटेड कॅमेरे बसविण्यात आली आहेत.