जबाबदार नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवाव्यात -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
दुर्गम भागामध्ये शिक्षणाची गंगा आणण्याचे काम-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये शिक्षणाची गंगा आणण्याचे काम या संस्थेमार्फत झाले असून, कोरोना काळात रोजगार निर्मिती बरोबरच गरजूंना धान्य वाटप करुन शिक्षणासोबत समाजसेवेचा वसा जपल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय पंचायत राज विभागाच्या माध्यमातून देशातील २ लाख ५५ हजार ग्रामपंचायती ॲपच्या माध्यमातून जोडण्यात येत असून प्रत्येक राज्यातील भाषेत हे ॲप असणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्या माध्यमातून केंद्राच्या २३ योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून ग्रामीण भागातील जनतेला लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील १० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमात राष्ट्रीय छात्र सेना विषयाचा समावेश - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात राष्ट्रीय छात्र सेना विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात कोवीड योध्दा म्हणून भूमिका बजावल्याचे सांगत किन्हवली परिसरामध्ये कृषि महाविद्यालय होण्यासाठी सहकार्य करु असे त्यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कोकण परिक्षेत्राचे उप महासंचालक संजय मोहिते, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि राष्ट्रपती शौर्यपदक विजेते शहापूरचे उपविभागीय अधीक्षक नवनाथ ढवळे यांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अरविंद भानुशाली यांनी प्रास्ताविक केले. संस्थेमार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमास कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, संस्थेचे उपाध्यक्ष खंडू विशे, डॉ. सुनिल भानुशाली, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुषमा हसबनीस यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने आणि समारोप वंदे मातरम् ने करण्यात आला.