पोषण माह’मध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याबरोबच निरंतर प्रयत्नांद्वारे कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
आदिवासी भागामधील कुपोषण निर्मुलनासाठी रानभाज्यांमधील पोषक तत्त्वांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. तसेच या भाज्यांच्या उत्तम पाककृतींचा समावेश रोजच्या आहारात करणे उपयुक्त ठरेल, असे मत अॅड. ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक अंगणवाडीतील शालेयपूर्व शिक्षण उत्कृष्ट व्हावे हे आपले स्वप्न आहे, असेही त्या म्हणाल्या. कोविड- 19 च्या काळात अंगणवाडी सेविकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केले. अनंत अडचणींवर मात करत, दुर्गम भागात, काही ठिकाणी नावेतून जात पोषण आहार पुरवला आहे. आताही अशाच प्रकारे आपल्याला काम करायचे आहे. कोविडचा धोका टाळून हे काम सुरक्षितरित्या करण्यासाठी राज्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका, मदतनीस यांचे शंभर टक्के कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
यावेळी प्रधान सचिव कुंदन म्हणाल्या, तीव्र कुपोषित बालकांवर लक्ष ठेऊन त्यांच्यापर्यंत आयसीडीएसच्या सेवा पोहचवण्यासाठी आणि कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मायग्रेशन सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल. गडचिरोली मध्ये 100 अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येणारा शालेयपूर्व शिक्षणाच्या तितली प्रकल्पातील उपयुक्त बाबींचा ‘आकार’ अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावा. पोषण माहमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या संख्येबरोबच त्यांची गुणवत्ताही उत्कृष्ट असली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. अग्रवाल म्हणाल्या, पोषण माहमध्ये ॲनिमियामुक्त भारत, बाळाचे पहिले 1 हजार दिवस, कुपोषण मुक्ती, गरोदरपणातील काळजी, पोषण-सुपोषण यावर वेबिनार, निबंध स्पर्धा यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. परसबागा अर्थात पोषण वाटिकांची निर्मिती, योगा, पोषण सामुग्रीचे वाटप, सॅम बालकांचा शोध आणि पोषण आहार व इतर मदत उपलब्ध करुन देणे, या प्रमुख संकल्पना पोषण माहमध्ये राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्ण महिन्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमादरम्यान मायग्रेशन सॉफ्टवेअरचे उद्घाटन, तितली प्रकल्पाचे उद्घाटन, केंद्र शासनाच्या पोषण ज्ञान पोर्टलवर ‘एक घास मायेचा’ या राज्याच्या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांनी बनवलेल्या पाककृतींच्या चित्रफीती अपलोड करण्याचा शुभारंभ, संपर्क संस्थेमार्फत ऑनलाईन पाककृती स्पर्धांचे प्रदर्शन आणि उद्घाटन करण्यात आले. माता बाल पोषणाची शिदोरी उपक्रमाची ऑनलाईन चित्रफीतीचे संगणकीय कळ दाबून उद्घाटन, कोविड काळात अंगणवाड्यांनी केलेल्या कामाबाबतचा अभ्यास अहवाल, बाल कल्याण समितीच्या कार्य अभ्यास अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.