मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक साकीनाका प्रकरणी एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करावे
मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी केल्या महत्वपूर्ण सूचना मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे
१ महिन्यात दोषारोपपत्र दाखल करा
मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घटनेतील सर्व न्यायवैद्यकीय , इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे पुरावे व्यवस्थित जमा करून हे प्रकरण न्यायालयात मजबुतीने मांडावे तसेच कुठेही कमतरता राहणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल झाले पाहिजे तसेच न्यायालयात खटला उभा राहील त्याची वाट न पाहता उद्यापासूनच विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून काम सुरु करावे असेही निर्देश दिले.
जलदगती न्यायालयात खटला चालवणार
हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होईल असे पाहून पिडीत दुर्दैवी महिलेस न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई हे देशातील एक सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. लोकांचा पोलिसांवर आणि कायदा व सुव्यवस्था यावर विश्वास आहे. मात्र अशा घटनेमुळे आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही महत्वपूर्ण सूचना पोलिसांना केल्या, त्या पुढीलप्रमाणे, महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी, महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उदभवू शकतो अशी शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणी देखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी, महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे. गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्वाच्या ठिकाणी बसविण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी.