निजामकालीन शाळांचा पूर्ण कायापालट करणार

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

· परभणीत 200 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय · औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना · पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना पूर्णत्वास नेणार

औरंगाबाद प्रतिनिधी : शिक्षण, आरोग्य, परिवहन, नगरविकास, पायाभूत सुविधा, कृषी अशा विविध क्षेत्रात मराठवाड्याचा आमूलाग्र कायापालट घडवणारे अनेक महत्त्वाचे निर्णय राज्यातील विद्यमान सरकारने घेतले आहेत. त्यांची कालबद्ध अंमलबजावणी करुन येथील विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान केली जाईल, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी व्यक्त केला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,  रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार सय्यद इम्तियाज जलील, खासदार अनिल देसाई, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, मनिषा कायंदे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंह राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींसह  स्वातंत्र्य सैनिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा विजय दिन असून स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यानंतर  निजामांच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ आदींसह अनेक कर्तृत्ववान अशा नेतृत्वात अन्याय, अत्याचाराचा प्रतिकार येथील जनतेने केल्याचा गौरवास्पद उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी या लढ्यातील ज्ञात, अज्ञात सर्व वीर, वीरांगना यांना प्रारंभी अभिवादन केले.लोहपुरूष वल्लभभाई पटेल यांच्यासमोर निजामाने शरणागती पत्करल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी स्वतंत्र्य झालेल्या मराठवाड्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे कार्य शासन करत असल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मराठवाडा संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये पैठण या ठिकाणी संतपीठाची स्थापना करण्यात आली आहे. या संतपीठाचे विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. या ठिकाणी जगातील संशोधक, अभ्यासासाठी यावेत, अशी अपेक्षा आहे. संतपीठाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे देण्यात आलेली आहे. तसेच जुलमी निजामी राजवटीच्या खुणा पुसून काढण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील 144 निजामकालीन शाळा आणि वर्गखोल्या या नव्याने बांधून त्यांचा पुनर्विकास करण्यात येऊन वैभव प्राप्त होतील अशा शाळा उभारण्यात येणार आहेत.

     मराठवाड्यातल्या पहिल्या जागतिक दर्जाच्या सिंथेटीक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना दिली जाईल. जेणेकरून मराठवाड्यातील उद्योग व्यवसायास फायदा होईल. औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवा सुरु होऊ शकते का याचाही विचार करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.ठाकरे म्हणाले, औरंगाबादेत नव्याने समाविष्ट सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणाची, विविध मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे करण्यात येत आहेत. औरंगाबादची तहान भागवणारा आणि खूप काळ आपण वाट पाहत असलेल्या 1680 कोटींच्या  पाणी पुरवठा प्रकल्पाचे कामही वेगाने सुरु आहे. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा फायदा मराठवाड्याला होणार आहे. औरंगाबाद- शिर्डी मार्गाचे श्रेणीवाढ करण्यात येईल. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या १९४.४८ कि.मी.च्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देण्यात येईल. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन वैशिष्ट्यपूर्ण राहील. या ठिकाणाहून स्फूर्ती, प्रेरणा मिळेल, असे स्थळ करण्यावर शासनाचा भर राहील.  तसेच जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण पार्क म्हणून औरंगाबाद सफारी पार्कसाठी जागेची निश्चिती करून तातडीने आवश्यक त्या परवानग्या मिळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी व पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करावे, अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

परभणी, हिंगोली, उस्मानाबादमध्येही विकासाला प्राधान्य

     परभणी येथे 200 बेड्सचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. परभणी शहरात भुयारी गटार योजना, अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेचाही विचार सुरू आहे. तसेच उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालय, भूमिगत गटार योजनेचे कामही सुरू आहे. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देण्यात येत आहे. हिंगोलीतील दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी सहा कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. औरंगाबादेतील घृष्णेश्वर मंदिर सभामंडपाचा विकास, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसर, नाथ मंदिर परिसराचा विकासही करण्यात येणार आहे. निधीअभावी कोणताही प्रकल्प, योजना रखडणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मराठवाड्यात 200 मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 360 मेगा वॅट सौर प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. त्यापैकी 119 मेगा वॅट प्रकल्प मराठवाड्यात तसेच मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील टेंभी आणि बीड जिल्ह्यातील वडवणी येथे येत्या वर्षात जवळपास 200 मेगा वॅट सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. 

जिद्द व संयमाने लढाई जिंकू

   मागील दीड वर्षात जनतेने संयम व जिद्दीने कोरोनाविरूद्धची लढाई जिंकली आहे. यापुढेही स्वयंशिस्त, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत आपण कोरोनाविरूद्धची लढाई जिद्द,संयम व स्वयंशिस्तीच्या माध्यमातून जिंकणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.प्रारंभी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिस दलाकडून हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.

ॲड.दिगंबर वाघ.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८