मुंबई प्रतिनिधी : राज्यातील शहरातील कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रभागनिहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण सत्राचे नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत. राज्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी कवच कुंडल अभियान राबविण्यात येत आहे. येत्या चौदा ऑक्टोबर 2021 पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने डॉ. व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत.
त्यांनी दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे
सर्व आयुक्तांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घ्यावी. बैठकीत महसूल, शिक्षण, महिला बालविकास, नगरविकास अशा विविध विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात यावे, लसीकरण सत्राचे प्रभागनिहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय नियोजन करावे, कार्यक्षेत्रातील लोकसंख्या आणि लसीकरण न झालेल्या नागरिकांच्या लोकसंख्येनुसार लसीकरण सत्राचे नियोजन करावे, एका प्रभागाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाचे लसीकरण करावे. पहिल्या डोसचे प्राधान्याने आणि दुसरा डोस देय असलेले लसीकरण करावे, लसीकरणाकरिता डॉक्टर, अधिपरिचारिका, आरोग्यसेविका, इंटर्नस यांनी व्हैक्सिनेटर म्हणून काम करावे, लसीकरण सत्रापुर्वी दोन दिवस अगोदर जनजागृती करावी. त्यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी उद्घोषणा, समाजमाध्यमे यांचा वापर करावा, उपलब्ध लसींच्या साठ्यानुसार पुढील तीन दिवसांसाठी सत्रांचे नियोजन करावे.