एम.आय.डी.सी.च्या परीक्षेत ही गैरप्रकार झाला ?

एमपीएससी समन्वय समितीकडून लवकरच पोलिसांत तक्रार

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एमआयडीसीच्या भरती परीक्षेच्या निकालावर एमपीएससी समन्वय समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. -मंगल हनवते

मुंबई प्रतिनिधी : आरोग्य विभाग म्हाडा शिक्षक पात्रता भरती परीक्षेनंतर आता एमआयडीसीच्या (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एमआयडीसीच्या भरती परीक्षेच्या निकालावर एमपीएससी समन्वय समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकलेल्या मे अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेतही मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप समितीने केला आहे. कारण अ‍ॅपटेककडून घेण्यात आलेल्या एमआयडीसीच्या परीक्षेत ज्या परीक्षार्थींना ९९-१९६ गुण आहेत त्याच परीक्षार्थींना याआधी घेण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेत मात्र १४ ते ३३  गुण मिळाले आहेत. पालिकेची परीक्षा टीसीएसने घेतली होती. गुणांमधील हा मोठा फरक पाहता यात गैरप्रकार झाल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यानुसार आता लवकरच याविरोधात समितीकडून पुणे सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षाही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
    एमआयडीसी ८६५ पदे भरण्यासाठी २०१९ जाहिरात काढण्यात आली. सहाय्यक अभियंता(स्थापत्य) लिपिक  टंकलेखक  कनिष्ठ अभियंता यासह अन्य पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ही परीक्षा पार पडली. या परीक्षेत ही मोठा गैरप्रकार झाला असण्याची शक्यता एमपीएससी समन्वय समितीने व्यक्त केली आहे.कारण मुळात ज्या अ‍ॅपटेक कंपनीने एमआयडीसीच्या भरती परीक्षा घेतली त्या कंपनीला दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकले आहे. परीक्षेत गैरप्रकार केल्याचा ठपका अ‍ॅपटेक ठेवत न्यायालयाने त्यांना काळ्या यादीत टाकले आहे.महाआयटीने मात्र या कंपनीला आपले यादीत समाविष्ट केल्याने एमआयडीसीने अ‍ॅपटेकची निवड केली आणि या कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेतली. आता याच अ‍ॅपटेकने घेतलेल्या एमआयडीसीच्या परीक्षेच्या गुणांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी दिली.एमआयडीसीच्या परीक्षेत असे अनेक परीक्षार्थी आहेत ज्यांना मुंबई महानगरपालिकेच्या भरती परीक्षेत १४, १६, २१, ३३ गुण मिळाले आहेत. त्याच परीक्षार्थींना एमआयडीसीच्या परीक्षेत मात्र ९९, १००, १९६ गुण मिळाले असल्याची माहिती कवठेकर यांनी दिली.  याप्रकरणी एक-दोन दिवसांत पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 पालिकेत १५ तर एमआयडीसीत ९९ गुण
    १५ डिसेंबरला जाहीर झालेल्या निकालानुसार दोन परीक्षार्थी असे आहेत की ज्यांना मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेत १५ गुण मिळाले आहेत. तर एमआयडीसीच्या परीक्षेत मात्र त्यांना ९९ गुण मिळाले आहेत. या दोन्ही परीक्षार्थींची अधिक माहिती मिळवली असता धक्कादायक बाब समोर आल्याचे कवठेकर यांनी सांगितले. हे परीक्षार्थी भाऊ-बहिण असून त्यांचे वडील एमआयडीसीत वरीष्ठ पदावर कार्यरत आहेत. पालिकेच्या आणि एमआयडीसीच्या गुणांत मोठी तफावत असल्याची अनेक उदाहरणे आम्हाला सापडली आहेत. त्यामुळे आता सर्व पुराव्यानिशी आम्ही लवकरच या प्रकरणी तक्रार दाखल करणार आहोत.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८