केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरिता सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारी 2022 रोजी होणार
केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई व भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्रे नागपूर नाशिक अमरावती औरंगाबाद व कोल्हापूर येथील प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून www.siac.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) अर्ज मागवण्यात येत आहेत. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना सन 1976 साली झाली असून महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांचा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत टक्का वाढावा या उदात्त हेतूने करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. सन 1976 पासून आजतागायत संस्थेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे व संस्थेत प्रशिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी देशातील वेगवेगळ्या राज्यात व परदेशात देखील भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत अशी माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई चे संचालक डॉ.खुशपत जैन यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.