"सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली" -राज्यपाल
मुंबई प्रतिनिधी : स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला - मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.
▶️".. अनाथांची मातृदेवता हरपली ..!' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
'सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.
दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं. इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही. पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरावयाचे आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेला दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली महिला निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
▶️ समाजातील हजारो अनाथांच्या डोक्यावर मायेची पखरण करणारं मातृछत्र हरपले -उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात सिंधुताई सपकाळ यांनी समाजातल्या हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला त्यांना शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे केले त्यांना मायेची सावली दिली. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करत, त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आयुष्यभर संघर्ष कष्ट करत त्यांनी सामाजिक कामाचा वसा जपला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
▶️ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे सेवाव्रती समर्पित व्यक्तिमत्त्व गमावले -अशोक चव्हाण
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे या शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत.सिंधुताईंनी खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना मायेचा आधार दिला. अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
▶️ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.