मच्छिमार करणाऱ्यांसाठी तलाव ठेका भरण्यास मुदतवाढ

लाव ठेक्याने घेणाऱ्या राज्यातील मच्छिमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मे अखेरपर्यंत मुदतवाढ-मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

मुंबई प्रतिनिधी:  कोरोना प्रादूर्भाव काळात आर्थिक झळ सहन कराव्या लागलेल्या राज्यातील मच्छिमार मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव, जलाशयांची  वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच २०२१-२२  तलाव ठेक्याची रक्कम माफ करण्याचा  प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात येईल अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

    कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी  राज्यात घोषित टाळेबंदी राज्यातील मच्छिमार मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही तसेच उत्पादित मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मच्छिमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

    राज्यातील मच्छिमार मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव आणि जलाशयांची चालू वर्ष सन २०२१-२२ ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी  ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असे मंत्री  शेख यांनी सांगितले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८