महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळावा, मातृभूमीची सेवा आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी शासनाच्या अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवीर जनरल ड्युटी (सर्व शस्त्र), अग्नीवीर ट्रेडसमन (सर्व शस्त्र), अग्नीवीर तांत्रिक (सर्व शस्त्र), अग्नीवीर लिपिक, भांडारपाल तांत्रिक (सर्व शस्त्र) या पदांसाठी भरती प्रक्रिया 13 ऑगस्टपासून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानांवर सुरू झालेली आहे. भरती प्रक्रिया 08 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांना 13 नोव्हेंबर रोजी सामाईक प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. शिस्तबद्ध, पारदर्शक, नि:पक्षपाती पद्धतीने व योग्य नियोजनाने भरती प्रक्रिया भरती अधिकारी प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जात आहे.
औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील तरूण या भरतीत सहभागी झालेले आहेत. या भरतीत सहभागी उमेदवारांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. भरतीत सहभागींना स्वयंसेवी संस्थांकडून भोजन देण्यात येते आहे. भरती प्रक्रिया परिसरात स्वच्छता राखली जावी, या उद्देशाने महानगर पालिकेने पाण्याची व्यवस्था, परिसर स्वच्छता, फिरते शौचालये आदींची याठिकाणी व्यवस्था केलेली आहे. भरती ठिकाणाहून उमेदवारांना बस स्थानक, रेल्वे स्थानक अथवा भरतीच्या दिवशी असलेल्या गावांमध्ये पोहोचविण्याची सोयही राज्य परिवहन महामंडळाने केलेली आहे. या सुविधेमुळे भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाने चांगली व उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे आभारही मानले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने भरती दरम्यान मैदानावर आवश्यक प्रकाश योजनेसाठी दोन जनरेटर्स, जिल्हा परिषदेने 10 शिक्षक, भरतीत कुणास इजा झाल्यास तत्काळ उपचार मिळावा यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, पोलिस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मैदाने, राहण्याची व्यवस्था, एनआयसीद्वारा इंटरनेट सुविधा आदी सोयी भरती कालावधीत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. दररोज मध्यरात्री 12 वाजता भरती प्रक्रिया सुरू होऊन सकाळी सहा वाजेपर्यंत शिस्तबद्धरित्या व पारदर्शकपणे पार पाडल्या जात असल्याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी समाधानही व्यक्त केले आहे.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८