मुसळधार पावसातही अनंत चतुर्दशीच्या दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात कल्याण डोंबिवली परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण  : कालच्या मुसळधार पावसातही अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि शांततापूर्ण रीतीने कल्याण डोंबिवली परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था यांच्या मदतीने तसेच महापालिका अधिकारी/कर्मचारी पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिनांक 31/8/2022 ते 9/9/2022 या कालावधीतल्या भाद्रपद महिन्यातील गणेश मूर्तींचे विसर्जन विविध विसर्जन स्थळांवर करण्यात आले. त्यापैकी विसर्जन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत 404 श्री गणेश मूर्तींचे आणि विविध विसर्जन स्थळांवर 9536  गणेश मूर्तींचे आज पहाटेपर्यंत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत विसर्जन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत एकूण 3244 गणेश मूर्तींचे आणि विविध विसर्जन स्थळांवर 55805 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

    महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार आणि परिमंडळ 1 चे उपायुक्त धैर्यशील जाधव व परिमंडळ 2 च्या उपायुक्त  स्वाती देशपांडे, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी निर्माल्य व्यवस्थापनाकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. महानगरपालिकेने विसर्जन स्थळांवर  फायर ब्रिगेड स्वयंसेवक, रबरबोट इत्यादी साहित्य सज्ज ठेवले होते त्याचप्रमाणे विसर्जन स्थळे व विसर्जन मार्गावर 168 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व 2455 हॅलोजनची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशोत्सवादरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकूण 67 जनरेटर, 88 लाइटिंग टॉवर विद्युत विभागामार्फत बसविण्यात आले होते. विसर्जन स्थळी जमा झालेले एकूण 171 टन निर्माल्य डोंबिवली येथील गणेश मंदिर संस्थान  एमआयडीसी येथील खत प्रकल्प,आयरे बायोगॅस प्रकल्प, कचोरे बायोगॅस प्रकल्प उंबर्डे बायोगॅस प्रकल्प येथे देण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले  अशाप्रकारे निर्माल्य खाडी नदी या मध्ये न टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात घट झालेली आहे. यास नागरिकांचा व गणेश मंडळांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८