"गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूर लोकांनी सहकार्य करावे"-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई  प्रतिनिधी : समाजातील वृद्ध निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे. वृद्ध रुग्णांची सेवा हे दैवी कार्य असून जीवनाच्या संध्याकाळी आजारी रुग्णांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूर लोकांनी तसेच कार्पोरेट्सनी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.गंभीर आजारामुळे अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणाऱ्या राजे पंचम जॉर्ज स्मृती विश्वस्त संस्थेच्या अधिपत्याखाली 'सुकून निलाय' रुग्णसेवा केंद्र व 'मुंबई उपशामक रुग्णसेवा नेटवर्क' या संस्थांच्या वतीने मुंबई येथे 'जागतिक उपशामक रुग्णसेवा' दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. 

    वृद्ध व निराधार लोकांना  रुग्णसेवा देण्याचे चांगले कार्य मुंबईतील काही संस्था करीत आहेत. या कार्यात मोठे आर्थिक सहकार्य करणाऱ्या सिप्ला फाऊंडेशनचे कौतुक करताना इतर कार्पोरेट्सनी देखील त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून उपशामक रुग्णसेवा देणाऱ्या संस्थांना मदत करावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. यावेळी राज्यपालांनी आपल्या स्वेच्छा निधीतून पंचम जॉर्ज स्मृती विश्वस्त संस्थेला २५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.राज्यपालांच्या हस्ते वांद्रे मुंबई येथे असाध्य कर्करुग्णांना सेवा देणाऱ्या 'शांती आवेदना' या संस्थेचे संस्थापक डॉ एल जे डिसुझा तसेच टाटा कर्करोग रुग्णालयातील रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट डॉ मेरी ऍन मुकादन यांचा त्यांच्या उपशामक रुग्णसेवा क्षेत्रातील मुलभूत कार्यासाठी  सत्कार करण्यात आला. 

    पंचम जॉर्ज स्मृती विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष डॉ एरीक बॉर्जेस यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.  सुरुवातीला दिव्यांग प्रौढ मुलांनी नृत्य व नाट्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त व सदस्य, दिव्यांग प्रौढ व पालक तसेच संस्थेचे आश्रयदाते उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८