मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम राबवित असतात. याच जनजागृतीचा भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे हे ‘कशी होते मतदार नोंदणी ?’ या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये 18 नोव्हेंबर 2022 रोजी ठाणे येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि के.ग.जोशी कला व ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील थोरले बाजीराव पेशवे सभागृहात सकाळी 9.30 वाजता ‘कशी होते मतदार नोंदणी?’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
18 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे समाजमाध्यमांवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरूनही या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, मतदार केंद्रस्तर अधिकारी तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेतील अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे मतदार नोंदणी संदर्भात विद्यार्थ्यांना काही प्रश्न असल्यास ते ऑनलाईनही विचारू शकतील.या मतदार जागृतीच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी केले आहे.