महाराष्ट्र आणि ओंटारियो राज्य (कॅनडा) यांच्यात सामंजस्य करार
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत व ओंटारियो राज्याचे (कॅनडा) आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापार मंत्री व्हिक्टर फेडेली यांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार राज्यात माहिती तंत्रज्ञान, वित्त, मीडिया, ऑटोमोबाईल, अन्न प्रक्रिया, अंतराळ (एरोस्पेस) या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, कॅनडाच्या आर्थिक विकास मंत्रालय, रोजगार निर्मिती आणि व्यापार विभागाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व संचालक क्रिस्टीना क्रिटेली, व्यापार मंत्री कार्यालयाचे कर्मचारी प्रमुख हेदर पॉटर, भारतातील वाणिज्यदूत दिग्विजय मेहरा आणि ओंटारियो सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सामंजस्य कराराविषयी
· महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन्ही राज्यातील संबंध वृद्धींगत करुन खाजगी व शासकीय क्षेत्रामध्ये भागीदारी वाढविण्यावर भर देण्यात येईल. दोन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अशा प्रकाराचे प्रयत्न करताना दोन्ही राज्यांनी त्याचा लाभ घेतला जाण्याची दक्षता घेण्यात येईल.
· दोन्ही राज्यांमध्ये वित्तीय तसेच औद्योगिक विकासाबरोबरच कौशल्य वृद्धी विकास करण्यावर सहकार्य आणि संमतीने कार्यवाही करण्यात येईल.
· दोन्ही राज्य व्यापारवृद्धी आणि गुंतवणुकीमध्ये वृद्धी व्हावी याकरिता प्रयत्न करतील.
· या करारामध्ये कार्यप्रणालीवर भर देण्यात येईल. स्थानिक व क्षेत्रियस्तरावर परिसंवाद आणि चर्चासत्र आयोजित करण्यात येतील व दोन्ही राज्यातील प्रतिनिधींना,अनुभवी व्यक्तींना यासाठी आमंत्रित करण्यात येईल.
· उद्योगवाढीसाठी आवश्यक क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करुन नवीन तंत्रज्ञान आधारित उद्योगवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.
· दोन्ही राज्यातील संशोधन क्षेत्रातील कंपन्या, इतर औद्योगिक कंपन्या आणि शासकीय अधिकाऱ्यांना संमेलित करुन घेण्यात येईल.
· दोन्ही पक्ष औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक व रोजगार वृद्धीसाठी एकमेकांना सर्वतोपरी सहाय्य करतील.
· विशेषतः माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान, माध्यम आणि मनोरंजन, विद्युत वाहन आणि बॅटरी पुरवठा, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण या बाबींवर जास्त लक्ष देण्याबरोरबच इतरही बाबींकडे पूर्णपणे लक्ष देण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात येत आहे.