चला खेळूया उत्सवात चार हजारांहून अधिक मुलांच्या सहभाग महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग युनिसेफच्या सहकार्याने जागतिक बालदिन साजरा
मुंबई प्रतिनिधी : खेळण्याच्या अधिकाराचा पुनरुच्चार करत जागतिक बाल दिनानिमित्त रविवारी सकाळी चार हजारांहून अधिक मुले प्रियदर्शनी पार्क येथील सुरू असलेल्या 'चला खेळूया' उत्सवामध्ये सहभागी झाली होती. फुटबॉल, टेनिस, क्रिकेटचे सामने, मल्लखांब आणि अनेक साहसी खेळांमध्ये मुलांनी आपला सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई जिल्हा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर २० आणि २१ असे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था क्राय, नाइन इज माइन आणि सिटीझन असोसिएशन फॉर चाइल्ड राइट्स यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
जागतिक बाल दिन हा २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्कावरील ‘कन्व्हेन्शन ऑफ द चाइल्ड राइट्स’ (CRC) संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून अस्तित्वात आले. लिंग, वंश, धर्म, अपंगत्व, लैंगिकता किंवा इतर भेदभावांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंद मिळायला हवा यासाठी त्यांच्या अधिकारांचे संरक्षण केले जाते. या वर्षीची संकल्पना ‘खेळण्याचा अधिकार’ असल्याने भारतीय संघाची माजी बास्केटबॉल कर्णधार दिव्या सिंग मुलांबरोबर खेळामध्ये सहभागी झाली होती.
या उत्सवासाठी प्रियदर्शनी उद्यानात २० आणि २१ नोव्हेंबर रोजी फुगे, पोस्टर, रोषणाई आणि ध्वजांनी मुलांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी मातीची भांडी, कला भिंत, कथाकथन, मॅजिक शो, टॅटू आणि बबल मेकिंगचे विविध स्टॉल होते. मुलांनी त्यांच्या आवडीच्या कार्यशाळेचा आनंद घेतला. रोचीराम थडानी स्कूल फॉर हिअरिंग हँडिकॅप्डच्या मुलांनी सांकेतिक भाषेचा वापर करून अतिशय अभिनव पद्धतीने ‘वंदे मातरम’ सादर केले. मुलांच्या एका गटाने दोरी मल्लखांब सादर करून त्यांचे संतुलन कौशल्य दाखवले. दुसर्या गटाने नृत्य सादर करून लोकांकडून प्रचंड टाळ्या मिळवल्या.
भारतीय बास्केटबॉल संघाची माजी कर्णधार दिव्या सिंगने या कार्यक्रमात मुलांना प्रोत्साहन देत त्यांच्यासोबत खेळ खेळले. यावेळी बोलताना दिव्या म्हणाली की, मुलांसोबत असा वेळ घालवणे हा खूपच वेगळा अनुभव आहे. मला आनंद आहे की संयुक्त राष्ट्र संघाने या वर्षीच्या जागतिक बालदिनाची संकल्पना ही खेळण्याचा अधिकार अशी आहे. आपल्या देशात अनेक प्रतिभावान मुले आहेत ज्यात जागतिक दर्जाचे खेळाडू बनण्याची क्षमता आहे. तथापि, खेळाला गांभीर्याने न घेणे, फारच कमी संधी उपलब्ध असणे आणि एकूणच खेळाप्रती असलेली उदासीनता यामुळे क्रीडाक्षेत्रात करिअर करणे कठीण होऊन बसते. खेळ हा आपल्या मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हा संदेश समाजाला देण्यासाठी आपण ही संधी घेतली पाहिजे. आपण त्यांना त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी दिली पाहिजे.
यावेळी मुलांचे स्वागत करताना अॅड. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांनी बालस्नेही महाराष्ट्र करण्यावर आयोगाचा भर असल्याचे सांगितले. आम्ही बाल हक्कांचे संरक्षण करण्यावर विश्वास ठेवतो आणि स्वराज्य, सत्य आणि अहिंसा या भारतीय मूल्यांचे पालन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुलांवरील कोणत्याही अत्याचार किंवा हिंसाचाराला आम्ही तीव्र विरोध करतो आणि अशावेळी कडक कारवाई केली जाईल. महात्मा गांधींनी सत्याच्या मार्गावर चला असे सांगितले होते, तीच शिकवण देऊन आपण मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे. जागतिक बालदिन हा केवळ उत्सव साजरा करण्यापुरताच नाही तर बालकांच्या हक्कांची ओळख देखील व्हावी. राज्यात प्रत्येक मुलाला शिक्षण, उत्तम आरोग्य, पौष्टिक आहार आणि खेळण्यासाठी जागा मिळावी, अशी आमची इच्छा आहे.सुसीबेन यांनी यावेळी मान्यवरांना बालहक्क संरक्षण आणि बालस्नेही महाराष्ट्र घडविण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले.
अल्पा वोरा बाल संरक्षण विशेषज्ञ युनिसेफ महाराष्ट्र यांनी सांगितले की मुलांच्या समस्या हाताळताना आव्हाने आहेत. महाराष्ट्राच्या झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे स्थलांतरित किंवा रस्त्यावर राहणारी मुलांचे संरक्षण आणि हक्क हे एक मोठे आव्हान आहे. हिंसाचार आणि गैरवर्तन यापासून ही मुले अधिक असुरक्षित आहेत. त्यांना अत्यावश्यक सेवाही मिळत नाहीत. बाल विवाहांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता कोविडनंतरच्या काळामध्ये कुटुंबांना, पालकांना बरोबर घेऊन त्यासाठी उपययोजना करायला हव्यात आणि मानसिकता बदलायला हवी. महाराष्ट्रातील मुलांच्या विविध गरजा आणि हक्कांची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि समाजासोबत सहकार्य करण्यासाठी युनिसेफ वचनबद्ध आहे.
महिला आणि बाल विकास आयुक्त आर. विमला म्हणाल्या भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. ही मुले उद्या देशाचे नेतृत्व करतील आणि त्यांच्या निरोगी वाढीसाठी आपण संधी निर्माण केली पाहिजे. मुलांचे आणि तरुणांचे विचार ऐकायला हवेत कारण त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात त्याचा उपयोग होईल. आम्ही समाजाला मुलांच्या आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि सहभागाच्या हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो.
महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष निरीक्षक दीपक पांडे यांनी मुलांचे स्वागत करून त्यांच्या खेळाचा उत्साहाचे कौतुक केले. प्रत्येक मुलाला दररोज खेळण्याचे स्वातंत्र्य मिळावे कारण ते त्यांच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक आहे. पालक, शिक्षक आणि शाळा नेहमी आपल्या मुलांचे चांगले भविष्य सुनिश्चित करू इच्छितात. एक सरकारी अधिकारी या नात्याने, मला समजते की मुलांचे संरक्षण करणारे कायदे बनवण्याचा अधिकार आमच्याकडे आहे आणि त्याची अंमलबजावणी ही तातडीची प्राथमिकता आहे. त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये न्यायाधीश, पोलिस अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक नेते, आरोग्य अधिकारी आणि माध्यमांचाही सहभाग असतो. विशेषतः प्रसारमाध्यमांचा जनतेवर आणि राजकारण्यांवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी मुलांचे विचार, मागण्या थेट प्रेक्षकांसमोर मांडण्यास मदत करावी.