महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान


वी दिल्ली प्रतिनिधी : आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.  यातील मनिषा जाधव, राजश्री पाटील, अल्का कोरेकर या तीन परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्ष 2021 चे राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 50 परिचारिकांना तसेच परिचारक यांना  पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार  उपस्थित होत्या.

   सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) यांना आरोग्य क्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांची प्रभावीरित्या अंमलबजावणी केलेली आहे.जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत आज त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

   जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षाचा अनुभव आहे. पाटील यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

    पुणे येथील राज्य ग्राम आरोग्य परिचारिका (वीएचएन) तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या निवृत्त मेट्रन अल्का कोरेकर यांनाही फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले. कोरेकर यांनी तीन दशकांपासून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सध्या त्या राज्य सार्वजनिक आरोग्य परिचारीका आहेत. 1989 मध्ये रायगड येथे आलेल्या पुरामध्ये तसेच लातूर येथे आलेल्या भुकंपाच्या प्रसंगी पुनर्वसन झालेल्या रूग्णांची सेवा कोरेकर यांनी केली आहे. सन 2018 मध्ये त्यांना युनिसेफतर्फे लसीकरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्याबाबत अ दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोविड काळात केलेल्या रूग्ण सेवांमुळे राज्य शासनाच्यावतीने  विविध 4 पुरस्कार तर जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीनेही त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.

अंजली अनंत पटवर्धन यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहीर झाला होता. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

महाराष्ट्राची  सुपूत्री मीरा धोटे यांना फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार

    मूळ नागपूरच्या असणा-या मीरा धोटे यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती धोटे या दिल्लीतील जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. मागील 30 वर्षापासून त्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी नर्सिंग व्यवस्थापनात पदविका घेतलेली आहे. कोविडच्या काळात एम्समध्ये सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात  धोटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. संक्रमण देखरेख कायाकल्प, स्वच्छ भारत हे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल धोटे यांना अनेक प्रमाणपत्रांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आलेले आहे.प्रदान करण्यात आलेले पुरस्कार  वर्ष 2021 असून  एकूण 50 परिचारिकांना राष्ट्रीय  ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  पुरस्कार स्वरूपात पदक प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८