सक्षम लोकशाहीसाठी माध्यमांबरोबरच लोकांचे सहकार्य महत्त्वाचे-संपादक संदीप भारंबे

नागपूर विशेष प्रतिनिधी : सक्षम लोकशाहीसाठी माध्यमांबरोबरच लोकांचे सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन दै.सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी केले.राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात दै.सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

  यावेळी भारंबे म्हणाले“विधिमंडळाचे कामकाज जनतेपर्यंत पोहचविण्याचे प्रसारमाध्यम हे एक माध्यम आहे. सध्या प्रसारमाध्यमांची संख्या वाढते आहे. विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन करताना ते योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळावर सामान्य जनतेच्या दृष्टीने अंकूश ठेवण्याचे काम प्रसारमाध्यम करीत असतात. समाजाचे प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात त्यांचे सदस्य येत असतात. विधिमंडळाचे कामकाज व परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्याची महत्त्वाची भूमिका प्रसारमाध्यमे पार पाडित असतात.

    विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन करताना विधिमंडळाचा व विधिमंडळ सदस्यांच्या विशेषाधिकारांचा भंग होऊ नये याची काळजी वार्तांकन करणाऱ्या प्रतिनिधींना घ्यावी लागते. जनतेचे हिताचे प्रश्न जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न माध्यम प्रतिनिधी करीत असतात. जबाबदारी ओळखून ते काम करीत असतात. प्रिंट मिडीयाबरोबरच समाजमाध्यमे वाढत असताना सर्व माध्यमांनी विश्वासार्हता राखणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील जबाबदारी ओळखून एखाद्या जनहिताच्या निर्णयाची बातमी आल्यानंतर लोकचळवळ उभी करणे आवश्यक असल्याचेही भारंबे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी भारंबे यांचा परिचय करुन दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना भारंबे  यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८