छगन भुजबळ यांची यशस्वी शिष्टाई भिडेवाडा परिसरातील व्यावसायिक उच्च न्यायालयातील याचिका मागे घेणार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

नागपूर विशेष प्रतिनिधी : पुणे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल  पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

    विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल विधानसभेत यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी स्मारकाविषयी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागपूर येथील विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात बैठक झाली.यावेळी इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते तर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

    यावेळी आमदार भुजबळ यांनी प्रास्ताविक करताना या राष्ट्रीय स्मारकामध्ये मुलींची शाळा सुरू करणे तसेच त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात याबाबत सूचना केल्या.सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्मारकाच्या कामाला कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    यावेळी छगन भुजबळ यांनी या स्मारकाच्या रखडलेल्या विस्ताराच्या कामाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सन १९९२ साली पुणे शहारातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण करून सदर वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. सदर स्मारक व त्याच्या परिसराचे नूतनीकरण व जतन करण्यासाठी आवश्यक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेले आहेत. महात्मा फुले यांच्या राज्य संरक्षित स्मारकाशेजारी दिडशे मीटर अंतरावर पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीमध्ये महानगरपालिकेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम करण्यात आलेले आहे. या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्याचे नियोजित आहे. तेथे राहणाऱ्या रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करून रस्ता करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे फुले वाड्याच्या आजूबाजूला राहत असलेल्या काही नागरिकांच्या जागा संपादित करून या स्मारकाच्या विस्तारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करण्याची मागणी आहे. 

   फुलेवाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांचे जतन व विकसन होण्याच्या दृष्टीने दोन्ही स्मारकांच्या सभोवतालच्या भागाचे भूसंपादन आणि विकसन होण्यासाठी नगरविकास विभागाने दि. २५ नोव्हेंबर, २०२१ च्या शासन राजपत्राअन्वये प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१कक) नुसार हा निवासी झोन स्मारकासाठी आरक्षित केला आहे. या स्मारकांना वर्षभर राष्ट्रीय नेते व अतिमहत्वाच्या व्यक्ती भेटी देण्यासाठी येत असतात. मात्र येथे वाहतुक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्याने व नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी, भूसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि पुणे मनपाने या दोन्ही स्मारकांचा विस्तार आणि या वास्तूंसाठी जोड रस्ता विकसन प्रकरणी भूसंपादनाची कार्यवाही लवकरात लवकर करण्याची गरज आहे अशी मागणी त्यांनी केली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८