पहिल्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. प्रतिभा अहिरे यांची निवड

रंगाबाद प्रतिनिधी : दिनांक 18: स्री शिक्षणाच्या प्रणेत्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, मराठी विभागाच्या वतीने स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. मंगळवार, दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी कर्जत येथे पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन संपन्न होत असून या संमेलनाच्या  अध्यक्षपदी  औरंगाबाद येथील प्रख्यात कवयित्री, विचारवंत प्रा. डॉ.प्रतिभा अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.

    कर्जत येथील  रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.संजय नगरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की ,भारतामध्ये स्री शिक्षणाचा आरंभ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केला.  भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळेच आज समाजव्यवस्थेचा निम्मा घटक असलेल्या स्रिया शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारक कार्याला अभिवादन करण्यासाठी कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीने स्री शिक्षिका साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. दि.३जानेवारीला हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्या स्रियांना,शिक्षिकांना  हे संमेलन विचारपीठ ठरणार आहे.प्रा.अहिरे यांनी 'सावित्रीमाई फुले आणि बेईमान लेखण्या' या पुस्तकाचे लेखन करून सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकार्याचे विविध आयाम स्पष्ट केले आहेत. 'मला हवी असणारी पहाट' या कविता संग्रहासह 'समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून स्रियांची आत्मकथने', 'साहित्याचे समाजशास्त्र', आदि पंधरा ग्रंथ लिहिले आहेत.कर्नाटक,निपाणी येथे झालेल्या पहिल्या आंतरराज्यीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद,अकोला येथे झालेल्या अखिल भारतीय आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद,प्रति अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन औरंगाबादचे अध्यक्षपद भूषविले आहे.

    दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे संपन्न होणाऱ्या  पहिल्या स्त्री शिक्षिका  साहित्य संमेलनाचे उद्घाटन खासदार तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य  सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे .प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे , शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड , रयत शिक्षण संस्थेचे माननीय कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके आदिंची उपस्थिती राहणार आहे.स्वागत अध्यक्ष म्हणून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित दादा पवार हे राहणार आहेत. अशी माहिती प्राचार्य संतोष नगरकर यांनी दिली. या साहित्य संमेलनात सकाळच्या सत्रात बारामती एग्रीकल्चर एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट विश्वस्त सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ,व स्री शिक्षकांचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. पहिल्या सत्रात  नाशिक येथील डॉ.प्रतिभा जाधव  यांचा 'मी अरुणा बोलते' व  सातारा येथील प्रा. कविता म्हेत्रे  यांचा ' मी सावित्री बोलते' या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. दुसऱ्या सत्रात उषाताई अक्षय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली  'आजच्या मनोविश्वातून सावित्री हरवत चालली आहे ?' या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे . या परिसंवादात मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना महाजन,  मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वृषाली मगदूम, अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या मीरा सातपुते, तळेगाव ढमढेरे येथील सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा बाळसराफ सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .यात स्वाती पाटील( कर्जत) उज्वला जाधव, अंजली कुलकर्णी( पुणे) स्नेहा कोळगे (मुंबई) रचना (शेगाव) मधुश्री ओव्हाळ (पुणे )संगीता झिंजुर्के (बीड) संगीता फासाटे( श्रीरामपूर) शुभांगी भालेराव (कर्जत) जस्मिन शेख, (मिरज )सुरेखा बोराडे (नाशिक )समृद्धी सुर्वे (पुणे ) ज्योती धनवे (बीड) शिवकन्या साळुंखे (अंबाजोगाई) प्रतिभा खैरनार  (नांदगाव -नाशिक) पारमिता षडंगी (ओरिसा) आदि कवयित्री सहभागी होणार आहेत.

    या साहित्य संमेलनात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या व सामाजिक शैक्षणिक आणि साहित्य विषयक योगदान देणाऱ्या शिक्षकांना सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे ,रखमाबाई राऊत,मुक्ता साळवे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, दुर्गा भागवत, नजुबाई गावित, गेल ऑम्वेट , बारा कर्वे,भूमिकांच्या आदिंच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेतील स्त्री शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.राज्यातील शिक्षिकांनी या संमेलनात सहभागी होऊन संमेलन यशस्वी करावे असे आवाहन प्राचार्य डॉ ‌संजय नगरकर व रयत शिक्षण संस्थेच्या संयोजन समितीने केले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८