कर्तव्यपथावरील संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 14 विद्यार्थ्यांचा सराव
नवी दिल्ली प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सध्या राजधानीत सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे(एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थीनी सराव करीत आहेत.74व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने एनएसएस सराव शिबिर येथील इंटरनॅशनल यूथ होस्टेलमध्ये 1 जानेवारी 2023 पासून सुरु झाले आहे. देशभरातील 132 विद्यापीठातील 213 शैक्षणिक संस्थांमधून 200 विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनातील शिबिरात विविध टप्प्यातील निवड प्रक्रियेतून सहभागी झाले आहेत. यामध्ये पश्चिम (पुणे) विभागात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातून क्रमश: 7 विद्यार्थी व विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थीनी असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थीनी या शिबिरात सराव करीत असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संचालक डॉ. कमल कुमार कर यांनी दिली.
शिबिर 31 जानेवारी 2023 पर्यंत सुरु राहिल. यामध्ये दररोज सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत योगासने, बौद्धिकसत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येत, असल्याचे कर यांनी सांगितले. 1 ते 6 जानेवारीपर्यंत सकाळी व सायंकाळी जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर पथसंचलनाचा सराव आला. 7 ते 23 जानेवारीपर्यंत कर्तव्यपथावर पथसंचलनाचा सराव सुरु असल्याचे पुणे विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे यांनी सांगितले.या शिबिरात प्रत्येक राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रोज साजरा केला जातो. महाराष्ट्राचे पथक दररोज राज्याची लोक कला सादर करीत असल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. १५ जानेवारीला मकरसंक्रांतीचा खास सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांनी सादर केला.
एनएसएस शिबिरात महाराष्ट्रातील या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा समावेश
एनएसएसमध्ये सामील होणारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी विविध शाखेतील अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेत असतात. यावर्षी महाराष्ट्राच्या पथकात मुंबईतील अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाचा साहिल भोसले, सातारा जिल्ह्यातील बलवंत महाविद्यालयाचा श्लोक वरूडे, पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील डॉ.बी.एल.पुरंदरे कला महाविद्यालयाचा जयवंत दळवी, सोलापूर जिल्ह्यातील अकलुजमधील एस.एम. महाविद्यालयाचा सत्यजित चव्हाण, नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमधील एल.बी.एस. महाविद्यालयाचा विष्णू जाधव, मुक्ताईनगर येथील जी.जी.खडसे महाविद्यालयाचा प्रफुल्ल येमनेरे, पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड येथील मॉर्डन महाविद्यालयाचा अनमोल जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मुंबईतील के.सी महाविद्यालयाची संजना कऱ्हाडकर पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाची स्नेहल पांडे, ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची दीपशिखा सिंह, नवी मुंबईतील एमजीएमयू, वैद्यकीय महाविद्यालयाची आकांक्षा पाटील, परभणीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची साक्षी काशीकर, रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील पी.पी.इ.एस.ए.सी.एस. महाविद्यालयाची संयुक्ता हुजरे, कोल्हापूर जिल्ह्यातील दूध साखर महाविद्यालयाची करीना जमादार यांचा समावेश आहे.
यासोबतच गोवा राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाचा विद्यार्थी विनयानुज कुशवाह, म्हापूसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाची विद्यार्थींनी सोहाली नागवेंकर हिचाही समोवश पथसंचलनात आहे.