जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात शिक्षक सहभागी होतील -आमदार कपिल पाटील

मुंबई प्रतिनिधी : पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात शिक्षक सहभागी होतील अशी घोषणा आमदार कपिल पाटील यांनी आज केली. आज सकाळी रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या शिक्षक भारतीच्या स्नेहसंमेलनात ते बोलत होते. राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या प्रश्नासाठी लवकरच बेमुदत संपावर जाणार आहेत. शिक्षक भारतीच्या स्नेहसंमेलनात  प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मध्यावर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले. याबरोबरच कंत्राटी रोजंदारीवर काम करण्याऱ्यांना सरकारी सेवेत कायम करावे आणि नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे यासाठी हा संप होत असल्याचे सांगितले.

    याच कार्यक्रमात शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे याचे 'अभी नही तो कभी नही' या पेन्शन लढ्याबाबतच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जुन्या पेन्शनची लढाई अंतिम टप्यात असून आपण सगळ्यांनी त्यासाठी होणार्‍या संघर्षासाठी, मिशन 2024 साठी तयार राहिले पाहिजे, असं मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे होते. कार्यक्रमात बोलताना अशोक बेलसरे यांनी शिक्षक भारतीची भूमिका सर्वांसमोर मांडली. प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी आगामी काळातील प्रश्न याबाबत सर्वांना जागरूक केलं. कार्यवाह प्रकाश शेळके यांनी मागील काळात शिक्षक भारतीच्या माध्यमातून आमदार कपिल पाटील यांनी सोडवलेल्या प्रश्नांची सविस्तर यादी सर्वांसमोर ठेवली. मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे यांनी शाळाबाह्य मुलांचं शिक्षण आणि इतर प्रश्नांकडे लक्ष वेधलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पश्चिम मुंबई विभाग अध्यक्ष अमोल गंगावणे यांनी केले. 

  मुंबई मनपा प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न अधिवेशनात प्रभावीपणे मांडल्याबद्दल शिक्षक भारती प्राथमिक शिक्षकांच्या युनिटच्या वतीने आमदार कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक भारती विशेष शाळा महाराष्ट्र अध्यक्षपदी विलास पंडित, सचिव पदी अण्णा जाधव आणि मुंबई अध्यक्षपदी जयदीप बनसोडे, सचिव पदी संजय गोरड यांना यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली. शिक्षक भारतीचे कार्यकर्ते कैलाश गुंजाळ हे आगामी 'रौंदळ' या मराठी सिनेमाचे सहनिर्माते आहेत त्यांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८