अहमदनगरच्या भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबन वसुधा प्रकल्पाचे उद्घाटन..
मुंबई प्रतिनिधी : वसुधा प्रकल्पाच्या माध्यमातून भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून याचा पहिला प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे सुरू होत आहे. यामुळे भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, यापुढेही असे प्रकल्प राज्यभर सुरू करण्याचा मानसही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. विधिमंडळ दालनात आयोजित ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राज्यशासनाच्या महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर समाजपयोगी उपक्रमांचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पशुसंवर्धन मंत्री विखे-पाटील आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झालामहसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला गती मिळेल असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.
लोढा म्हणाले महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घायपतवाडी येथे महिला व बाल विकास विभाग यांचे अखत्यारीतील भिक्षेकरीगृह उपक्रम सुरु आहे. आजमीतीला सर्वसाधारपणे ५० भिक्षेकरी येथे स्थित असून शासकीय अनुदानाद्वारे त्यांना अन्न व निवारा यासारख्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मदत केली जात आहे. पर्यावरण संवर्धनपूरक उपक्रमांच्या अंमलबजावणीमधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. विविध विभागाद्वारे सुरु असणाऱ्या शासकीय योजनांचा एकत्रित लाभ या समाजघटकांना देता येणार असून पुनर्वसनाचे अनोखे मॉडेल या प्रकल्प द्वारे उभे राहू शकेल, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.
वसुधा पथदर्शी प्रकल्प राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल - राधाकृष्ण विखे-पाटील
वसुधा पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल असे सुतोवाच पालकमंत्री विखे-पाटील यांनी केले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ‘सबका साथ सबका विकास’ यामाध्यमातून सर्वांगीण विकासाच्या दिशेने आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. भिक्षेकरी समाज बांधवांना सन्मानाने जगता यावे, कष्टाची भाकरी मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, असे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन आयुक्त आर. विमला अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदी मान्यवर आणि श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.