मुंबई प्रतिनिधी : मुंबईत सुमारे नऊ ठिकाणी कबुतरखाने असून कोणत्याही कबुतरखान्याला हेरिटेज (वारसा) दर्जा प्राप्त नाही अथवा असा दर्जा देता येणार नाही असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.सदस्या उमा खापरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री सामंत म्हणाले की मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, जी.पी.ओ., एन.एस.रोड पेट्रोल पंप, ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगांव चौपाटी, नवजीवन सोसायटी, मलबार हिल, एम.एस. अली रोड जंक्शन व दादर या प्रमुख ठिकाणी कबुतरखाने असून येथे बऱ्याच वर्षापासून कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकले जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयातील श्वसनविकार चिकित्सा व पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये कबुतरांची विष्ठा व पर यामध्ये फंगल स्पोर्स (Fungal spores) आढळून आली होती. यामुळे माणसांना एक्सट्रेंसिक ॲलर्जिक ॲलव्होलिटीस (Extrensic Allergic Alveolitis) हा आजार होऊ शकतो. या आजाराची खोकला, दमा, ऑक्सिजनची पातळी कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य उपविधी, २००६ नुसार अघोषित क्षेत्रात पक्षी वा प्राण्यांना खायला घातल्यास, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवणे या कलमांतर्गत प्रति घटना ५०० रूपये इतका दंड आकारला जातो. मागील तीन महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खायला घालून उपद्रव माजविल्याबाबत १०,००० रूपये इतका दंड महानगरपालिकेमार्फत वसूल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.