कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य -कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

कामगारांना लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध

मुंबई प्रतिनिधी : कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आणि कार्यक्रम सुरू केले आहेत. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना आर्थिक साह्य, वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक साह्य यासारखे विविध फायदे प्रदान करण्यात येत असून यामुळे राज्यातील कामगारांना त्यांच्या हिताचे लाभ मिळतील”, असा विश्वास कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.गोरेगाव येथे आज नारायण मेघाजी लोखंडे जागतिक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार - 2022 प्रदान सोहळा तसेच सुरक्षा प्रदर्शनाचे उद्घाटन कामगार मंत्री डॉ.खाडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, डीशचे संचालक एम.आर.पाटील, गोदरेज ॲण्ड बायसचे कार्यकारी संचालक अनिल वर्मा, तसेच राज्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी आणि कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    डॉ.खाडे म्हणाले की आपले राज्य हे मजबूत औद्योगिक क्षेत्र आणि पायाभूत सुविधांसाठी देशभरात ओळखले जाते, ज्यामुळे ते औद्योगिक गुंतवणूक आणि उत्पादकांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याचा थेट परिणाम कामगारांच्या कल्याणावर आणि व्यवसायाच्या एकूण यशावर होतो. त्यामुळे या कारखान्यांमधील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, सुरक्षिततेबद्दल योग्य माहिती आणि प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी, सुरक्षा क्षेत्रातील कामगार, सुरक्षा अधिकारी, कारखाना व्यवस्थापन आणि इतर भागधारकांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता आणि महत्त्व वाढवण्यासाठी "वर्ल्ड ऑफ सेफ्टी, समिट आणि एक्स्पो" चे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मंत्री डॉ.खाडे यांनी केले.

   मंत्री डॉ.खाडे पुढे म्हणाले की कामगारांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासाठी Ease of Doing Business या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सरकारने अनेक पुढाकार घेतले आहेत. कामगारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने कामगार विभागाद्वारे विविध पावले उचलली आहेत. विभागाने आस्थापनांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी एक प्रणालीदेखील तयार केली आहे, ज्यामुळे व्यवसायांना कामगार कायद्यांचे पालन करणे तसेच विविध सेवा शासनामार्फत घेणे सोपे होत असल्याचेही ते म्हणाले.

   या प्रदर्शनात सुरक्षेशी संबंधित आपत्ती व्यवस्थापन, विद्युत सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्थापन, प्रथमोपचार प्रशिक्षण, उंच जागेवरील  सुरक्षा, सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर, वाहतूक सुरक्षा इ. विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे.  याव्यतिरिक्त ISO 45001, सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली, व्यावसायिक सुरक्षा कोड, औद्योगिक स्वच्छता, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अधिकाऱ्यांची भूमिका आणि औद्योगिक सुरक्षिततेशी संबंधित इतर विषयांचाही समावेश करण्यात आला आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८