नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वी दिल्ली प्रतिनिधी : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमानाची व सन्मानाची बाब असून या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

   देशाच्या राजधानीमध्ये नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे खासदार, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री संसदेचे दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते.

   नवीन संसदेच्या निर्मितीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे ही देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब आहे. आज या वास्तूचे लोकार्पण झाले असून संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट, वृद्धिंगत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील या नव्या वास्तूचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री यांचे अभिनंदन केले.

   नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या  पहिल्या टप्प्यात सकाळी सर्व धर्म प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला व नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभार लावलेल्या कामगारांचा गौरव त्यांनी केला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८