महसूल विभागातर्फे १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताह चे आयोजन

मुंबई प्रतिनिधी : महसूल विभागामार्फत राज्यात  1 ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच  1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे वसूलीच्या नोटीस पाठवणे मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच या वर्षी 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

  या महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीम, कार्यक्रम उपक्रम शिबिरे महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणर आहे. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा हा कार्यक्रम, 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद, 5 ऑगस्ट रोजी सैनिकहो तुमच्यासाठी 6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत तसेच निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा संवाद आणि 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

  या कार्यक्रमांचे नियोजन करुन याबाबतची प्रचार व प्रसिध्दी करण्याबरोबरच महसूल विभाग भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करुन विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करुन मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्वाचे कायदे विकास योजना उपक्रम धोरणे यांस प्रसिध्दी देण्यासाठी सखोल माहिती असलेल्या तज्ञाच्या मुलाखती तसेच व्याख्यानाचे प्रक्षेपण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर करण्यात येईल.महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करुन नागरिकांना देण्यात येणार आहेत.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८