समाजमाध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार
मुंबई प्रतिनिधी : समाजमाध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स व हिंदू पोस्ट ही संकेतस्थळे तत्काळ बंद करून संकेतस्थळ चालविणाऱ्या व लिखाण प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या कार्याविषयी खोट्या माहितीच्या आधारे चुकीची मांडणी करून समाजाच्या भावना दुखावणारा अपमानास्पद लेख इंडिक टेल्स व हिंदू पोस्ट या संकेतस्थळ आणि bhardwajspeaks या ट्विटर अकाऊंटधारकाने प्रसारित केला असल्याची बाब ३१ मे २०२३ रोजी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने निदर्शनास आली आहे. संबंधित पोस्ट व मजकूर लिहिणाऱ्या व प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपीचा शोध घेण्याकरीता संबंधित संकेतस्थळ व ट्विटरला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.कायद्यात असलेली जास्तीत जास्त शिक्षा आरोपीला होईल अशी तरतूद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.