सरला बेट विकासासाठी १५ कोटींचा निधी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
येथील योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज 176 व्याअखंड हरिनाम सप्ताहासाठी आज मुख्यमंत्री शिंदे आले होते. या सोहळ्यास राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, मठाधिपती संत रामगिरी महाराज तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनीही या सोहळ्यास उपस्थिती दिली होती.या अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित भाविकांशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर करीत संवाद साधण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, आपणा सर्व भाविकांना भेटता आलं हे माझं भाग्य. हरीनाम सप्ताहासारख्या अध्यात्मिक उपक्रमातून संत महात्मे हे चांगल्या गोष्टी शिकवून समाजाचे प्रबोधन करत असतात.वारकरी संप्रदाय हा अशाच लोकसेवेची शिकवण अंगिकारणारा संप्रदाय आहे. पंढरपूर येथे सुद्धा आषाढी-कार्तिकीला जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा शासन देत आहे. त्यात सुधारणा करून वारकऱ्यांना अधिक सेवा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की संत गंगागिरी महाराजांच्या शिकवणीचा अवलंब करुन जीवन जगल्यास प्रपंच करतांनाही परमार्थ साधता येतो. अशा प्रकारे दुसऱ्यांची सेवा करीत आयुष्य जगल्यास आपल्या वाट्याला दुःख येत नाही. राज्यातील सरकार हे सामान्यांचे सरकार असून शेतकरी सुखी व्हावा यासाठी शासन काम करीत आहे.पावसाने सध्या ओढ दिली आहे.पाऊस चांगला पडावा यासाठी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आहे.राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगारांना श्रमिकांना चांगले यावे यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उपस्थित भाविकांना आश्वस्त केले.
संत गंगागिरी महाराज यांच्या मठाकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर नाशिक आणि औरंगाबाद अशा तीनही जिल्ह्यातून लाखो भाविक या सोहळ्यास उपस्थित होते.