राज्यातील सर्वच रुग्णालयातील सी.सी.टी.व्ही.द्वारे ऑनलाइन देखरेख करावी-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ठाणे प्रतिनिधी चित्रलेखा रासने : वाहतूक पोलीस ज्याप्रमाणे सिग्नलवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करत असतात. त्याप्रमाणे राज्यातील सर्वच रुग्णालयाच्या आतमधील परिस्थितीचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात यावी. यातून रुग्णांची परिस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी त्या ठिकाणी रुग्ण कोणत्या अवस्थेत होता. त्याची काय परिस्थिती होती. हे समजण्यास मदत होईल. तसेच त्याला तत्काळ मदत पोहोचवता येईल, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी ठाणे येथील रुग्णालयात रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. त्यासंदर्भातील उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

  यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की कळवा रुग्णालयात घडलेली घटना दुःखद आणि धक्कादायक आहे. परंतु कोविड काळात आणि कोविडनंतर बऱ्याचशा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येते. यासंदर्भात राज्य शासनाने चौकशी समिती नेमली आहे.ज्या दिवशी घटना घडली त्यासंदर्भात नागरिकांना काही माहिती काळवायची असेल तर त्यांनी पुढे यावे. यासाठी स्थानिक प्रशासनाने त्यांना त्याबाबत संपर्क क्रमांक ई-मेल आयडी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून नागरिक प्रशासनासोबत थेट संपर्क साधतील. संपर्क करणाऱ्या नागरिकांची नावे गोपनीय ठेवली जावीत असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने रुग्णालयात आग प्रतिबंधक वस्तूंचा वापर होणे आवश्यक आहे. रुग्णालयात असणाऱ्या इलेक्ट्रिकल्स वस्तूंची वेळोवेळी तपासणी व्हावी असे. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात हीच सरकारकडून अपेक्षा असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

  या बैठकीला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे डॉ.रुपाली सातपुते आदी उपस्थित होते.यादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा सादर केला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८