मुंबई प्रतिनिधी चित्रलेखा रासने : ठाणे शहरामध्ये उभारावयाचा वर्तुळाकार मेट्रो लाईन प्रकल्प हा सर्व तांत्रिक बाबी तपासून तयार करण्यात आला आहे. या मार्गिकेच्या एकूण 29 किमी लांबी पैकी 3 किमी मार्ग हा भूमिगत आहे. या प्रस्तावाची मान्यता केंद्राकडे प्रलंबित आहे. सदर मेट्रो प्रकल्प महामेट्रो कंपनीकडून राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मार्फत राबविण्याबाबत मागणी लक्षात घेता, या प्रकल्पाची उभारणी महामेट्रो ऐवजी एमएमआरडीए कडे देण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य ॲड निरंजन डावखरे यांनी मांडली होती.याबाबत मंत्री सामंत पुढे म्हणाले प्रकल्पाच्या बाबत 2 जानेवारी 2023 रोजी ठाणे महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली आहे. तसेच एमएमआरडीएकडे काम देण्याबाबत 24 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पत्र दिले आहे. या पत्राचा पाठपुरावा शासन करेल.या प्रकल्पात 18 इमारती येतात. यापैकी 3 इमारतींचे प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेकडे प्राप्त झाले.याबाबत तेथील नागरिकांना न्याय द्यावयाचा आहे. असेच शासनाचे धोरण आहे असेही त्यांनी सांगितले.