मुंबई प्रतिनिधी : पाऊस पडल्यानंतर पावसाची अनेकविध रुपे पाहण्यासाठी पावसाळी पर्यटनाचा आनंद व उत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्यावतीने १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यटनप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.
पर्यटन मंत्री गिरीष महाजन म्हणाले की पर्यटकांनी आणि पावसाच्या थेंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे. या महोत्सवात पावसाचे मंतरलेले पाच दिवस अनुभवलेच पाहिजेत. १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या वर्षा महोत्सवामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी वैभवशाली परंपरा आणि आदिवासी बांधवांचे दुर्लक्षित राहिलेले कलागुण. त्याचबरोबर खाद्य परंपरा दुर्ग आणि किल्ले येथील जैव विविधता अशा अनेक गोष्टींना व्यासपीठ देणारा हा महोत्सव खऱ्या अर्थाने भंडारदरा व आंबोली पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेतानाच, महाराष्ट्रातल्या कला वैभवाची पर्वणी पाहता येणार आहे.
पर्यटन संचालनालयाचे पर्यटन संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की स्थानिक पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आवर्जून पहावी अशी ठिकाणे अंब्रेला फॉल्स विल्सन धरण कळसूबाई शिखर रंधा धबधबा रतनवाडी गाव अगस्त ऋषींचा आश्रम रतनगड किल्ला अमृतेश्वर मंदिर रिव्हर्स वॉटर फॉल कोकणकडा उंबरदरा खिंड, कुलंग खिंड मदनगड अलंगड पांजरेबेटे कोलटेंभे फॉल नेकलेस फॉल सांदनदरी ही आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत आंबोली, माधवगड पाँईट, तारकर्ली समुद्रकिनारा धामापूर तलाव शिरगावंकर पाँईट, नांगरतास धबधबा ही ठिकाणे पाहता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय १५ वा मजला नरिमन भवन नरिमन पाँईट मुंबई येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी चॅटबोट ९४०३८७८८६४ वर हाय पाठवा अहमदनगरच्या माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९१-९५९४१५०२४३ ९१-९९२१६६४००९ वर संपर्क साधा तर सिंधुदुर्ग येथे नाव नोंदणीसाठी ९३७१७३९६६६ ९४२०२०७०५५ वर संपर्क साधा तसेच अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.