विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी घेतले मुंबईतील गणरायांचे दर्शन

मुंबई प्रतिनिधी : विविध देशांचे महावाणिज्य दूत वाणिज्य दूत तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होऊन गणरायांचे दर्शन घेतले. हा सण समाजामध्ये एकतेची भावना निर्माण करणारा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याबरोबरच पर्यटन उद्योगासाठीही चालना देणारा महोत्सव आहे. धार्मिक सीमा ओलांडून एकात्मता जागवणारा सांस्कृतिक देवाण-घेवाण घडवणारा आणि आर्थिक वृद्धी साधणारा हा सण आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आज जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत वाणिज्यदूतांसाठी गणेश दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी दूतावासातील मान्यवरांचे स्वागत करून त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सवाबद्दल माहिती दिली.

  सिंगापूर दक्षिण आफ्रिका चिली थाई मॉरिशस जपान बेल्जियम ऑस्ट्रेलिया आयर्लंड  फ्रान्स युनायटेड किंग्डम कुवैत स्पेन इटली मेक्सिको, श्रीलंका स्वीडन आदी देशांतील सुमारे ४२ मान्यवरांनी यावेळी गणेश गल्ली तसेच वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेश मंडळांसह सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन घेतले.

  गणरायांच्या दर्शनानंतर पाहुण्यांनी आंतरराष्ट्रीय गणेश फेस्टिवल २०२३ अंतर्गत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे उभारण्यात आलेल्या विशेष सांस्कृतिक केंद्रात आयोजित कला प्रदर्शनाला भेट देऊन कलावंतांनी सादर केलेल्या विविध कलांचे कौतुक केले. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित या प्रदर्शनात वाळू शिल्प मॉझेक स्क्रॉल आर्ट वारली कला हस्तकला, मातीची गणेश मूर्ती बनविण्याचा अनुभव देणारे प्रशिक्षण, लोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम गणेशोत्सव काळात 'घर घर गणेश' आणि वेस्ट टू वंडर संकल्पनेवर आधारित ऑनलाईन फोटोग्राफी स्पर्धा आदींची रेलचेल होती. या माध्यमातून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनालाही वाणिज्यदूतांनी भेट देऊन चित्रांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

  राज्यातील पर्यटनाला चालना देणे पारंपरिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देणे तसेच गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी देऊन राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करणे या उद्देशाने पर्यटन संचालनालयाद्वारे १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मुंबई पुणे पालघर व रत्नागिरी येथे गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडित भागधारक ट्रॅव्हल एजंट टूर ऑपरेटर्स प्रवासी पत्रकार व समाजमाध्यम प्रभावक यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांना परिचय सहलीच्या माध्यमातून मुंबई पुणे पालघर व रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव दर्शनाची थेट सुविधा तसेच आपल्या सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबईतील विविध देशाच्या वाणिज्य दुतावासांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून त्यांना मुंबईतील नामांकित गणेश मंडळांमार्फत थेट दर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८