नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबतच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीत प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांची निवड
ठाणे प्रतिनिधी आकाश ढवळ : नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सांस्कृतिक विषयांचे तज्ज्ञ म्हणून सुकाणू समितीत समावेश नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात आली असून या समितीत सांस्कृतिक विषयांचे तज्ज्ञ म्हणून ज्येष्ठ नाटककार-साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २०२० मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षण पद्धतीत रचनात्मक बदल करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय यंत्रणा (नोडल एजन्सी) म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कार्यरत आहे. यासंदर्भात राज्यस्तरीय सुकाणू समिती मंगळवारी ०५ सप्टेंबर २०२३ रोजी गठीत करण्यात आली असून त्याबाबतचा शासननिर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला आहे. शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत ठाण्यातील प्रसिद्ध नाटककार-साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रा.डॉ.प्रदीप ढवळ हे शैक्षणिक साहित्यिक कला व सांस्कृतिक क्षेत्रात गेली चार दशके सक्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे विचार व कार्याचा परिचय करून देणारी नाटके तसेच जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यावरील चरित-कादंबरी व अन्य पुस्तकांचे लेखन-संपादन त्यांनी केले आहे. प्रा.डॉ.प्रदीप ढवळ हे सध्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून मराठी भाषा व साहित्याच्या प्रसार व विकासासाठी सक्रिय आहेत. ठाणे गौरव पुरस्कार साहित्य भूषण पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार असे २५ हून अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.शिक्षण धोरणाबद्दलच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीत प्रा.डॉ.प्रदीप ढवळ हे सांस्कृतिक विषयांचे तज्ज्ञ म्हणून काम करतील.
आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाचे उत्तुंग भरारी घेऊया २०२३
शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय ठाणे यांच्या वतीने ४ सप्टेंबर २०२३ रोजी राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे उत्तुंग भरारी घेऊया २०२३ हा करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले जळगाव येथील दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाजन यांच्या सामाजिक जाणिवेतून उदयास आलेली दीपस्तंभ–बहुउद्देशीय संस्था मनोबल संजीवन आणि गुरुकुल या तीन सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून बहुसंख्य दिव्यांग अनाथ आदिवासी व ग्रामीण भागातील मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करत आहे.
या सेमिनारच्या माध्यमातून महाजन यांनी विद्यार्थ्यांना करिअर कसे निवडावे ? आयुष्यात महत्वाचं काय ? चांगला माणूस होण्यासाठी काय करावे ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना हसत खेळत सोडवून दाखवली. तसेच या व्याख्यानादरम्यान आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून जिद्दीने यशाला गवसणी घालणाऱ्या दीपस्तंभाच्या विद्यार्थ्यांची कहाणी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितली. या सेमिनारची संकल्पना शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांची होती.
या कार्यक्रमास शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ संस्थेच्या विश्वस्त व आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ऍड.सुयश प्रधान आनंद विश्व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा हर्डीकर प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वी माणूस होण्यासोबतच एक चांगला माणूस होणे देखील महत्वाचे आहे हा संदेश या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवला गेला.