मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १६५.७८ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाची २७.७४ कोटी रुपयांच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे अशी माहिती मुंबईच्या राज्यकर सहआयुक्त (अन्वेषण- अ) प्रेरणा देशभ्रतार यांच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये देण्यात आली आहे.
मे. श्री समस्ता ट्रेडिंग प्रा. लि. व शरद क्लिअरिंग ॲण्ड फॉरवर्डिंग प्रा. लि. या व्यापाऱ्यांच्या विरोधात राज्य शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून कर चोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान बनावट कंपन्यांची स्थापना करून बोगस बिल देण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात मोहीम राबवीत प्रमुख सूत्रधार राहुल अरविंद व्यास व विकी अशोक कंसारा यांना ४ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक करण्यात आली. त्यांना महानगर दंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. बोगस व्यापार करून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे बाजारपेठेतील स्पर्धा नष्ट होऊन योग्य व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, या दोन जणांच्या अटकेतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.