महापालिकेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.

जास्तीत जास्त लोकाभिमुख प्रशासन राबविण्याचा महापालिकेचा कल असून त्यास नागरीकांनी सहकार्य करावे !-मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : जास्तीत जास्त लोकाभिमुख प्रशासन राबविण्याचा महापालिकेचा कल असून त्यास नागरीकांनी सहकार्य करावे असे उद्गार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी आज काढले. महापालिकेचा वर्धापन दिन सोहळा आज कल्याण (पश्चिम) येथील प्र.के.अत्रे रंगमंदिरात संपन्न झाला, त्यावेळी बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. पारदर्शकता व उत्तरदायित्व यासाठी प्रशासन कार्यरत असून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ अंतर्गत एकूण १०७ सेवा महापालिकेने घरबसल्या नागरीकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयात ई-ऑफीस प्रणाली देखील लागू केल्यामुळे नस्तींचा मागोवा घेणे सहज सुलभ झाले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. यासमयी महापालिकेचा इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

  या वर्धापन दिन सोहळ्यात महापालिका क्षेत्रातील जेष्ठ नागरीक संघातील प्रत्येकी २ जेष्ठ नागरीकांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे यावर्षी महानगरपालिकेने आयोजिलेल्या श्री गणेश दर्शन-२०२३ स्पर्धेतील विजेत्या मुर्तीकारांना व मंडळांना स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

  या कार्यक्रमात महापालिकेच्या दहाही प्रभागातील सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागांची गुणवैशिष्ट्ये सुलभ भाषेत विशद केली आणि प्रभागांच्या या गुण वैशिष्ट्यांना अनुसरुन महापालिका कर्मचारी वर्गाने बहारदार नृत्याविष्काराचे व मधूर गीतगायनाचे सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे खुमासदार सुत्रसंचालन सहा. आयुक्त सुहास गुप्ते व सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्र.के.अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक माणिक शिंदे व क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे अधिक्षक संजयकुमार कुमावत यांनी परिश्रम घेतले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८