मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश-मुख्यमंत्री
मुंबई प्रतिनिधी : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यात 12 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली -अजित पवार
नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा झालेला अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, हे वृत्त अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर या अपघातातील जखमींवर तातडीने, सर्वतोपरी उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्याबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवाशी नाशिक परिसरातील असून देवदर्शन करुन ते नाशिककडे परतत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.