मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन न केल्यास होणार कारवाई !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हवेतील प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले.धुळ प्रतिबंधक उपाययोजना तात्काळ अंमलात आणणेबाबत मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या बैठकीतील उपस्थितांना दुरदृश्य प्रणालीद्वारे संबोधिताना त्यांनी हे प्रतिपादन केले. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे व इतर अधिकारी वर्ग, पोलीस अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक अधिकारी आरटीओ चे अधिकारी एम.सी.एच.आय.चे प्रतिनिधी उपस्थित होते.

  महापालिकेने सर्व प्रभागांतर्गत धुळ नियंत्रण उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी प्रभागनिहाय पथकाची स्थापना केल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी या बैठकीत दिली. या पथकामध्ये बांधकाम विभागाचे उपअभियंता पथकप्रमुख राहणार असून त्यामध्ये अनधिकृत बांधकाम विभागाचे अधिक्षक स्वच्छता अधिकारी आणि संबंधित‍ विभागाकरीता नियुक्त असलेले नगररचना विभागाचे सर्व्हेअर यांचा अंतर्भाव राहिल.

  सदर अंमलबजावणी पथक परिसराला भेट देवून व्हिडीओग्राफी करेल व सदर ठिकाणी नियमातील तरतुदीचे पालन करीत नसल्यास काम थांबविण्याची नोटीस देईल किंवा सदर कार्यस्थळ तात्काळ सील करण्याची कारवाई करेल. ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवत किमान ३५ फुट उंच कथील/धातूचे पत्रे उभारले जातील याची सर्व प्रकल्प विकासकांनी/ठेकेदारांनी खात्री करावी. बांधकामाधीन सर्व इमारतींना हिरव्या कापडाने/ज्युट शीटने/ताडपत्रीने चारही बाजूंनी बंदिस्त करावे. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग करताना दरम्यान वॉटर फॉगिंग केले जाईल याची खात्री करावी.सर्व बांधकाम ठिकाणी C & D (बांधकाम आणि पाडणे) कचरा महापालिकेच्या सी आणि डी कचरा व्यवस्थापन योजनेनूसार निर्धारित ठिकाणी वाहून नेण्याची व्यवस्था करावी.

  राडारोडा उतरवल्यावर वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ केले जाईल याची खातरजमा करावी.सर्व बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायु प्रदुषण मॉनिटर्स बसविण्यात यावेत.हे मॉनिटर्स महापालिका अधिका-यांना आणि मागणीनुसार तपासणीसाठी उपलब्ध करुन दिले जातील अशी व्यवस्था करावी. सर्व बांधकामाच्या ठिकाणी वायूप्रदुषण पातळी नियंत्रीत राखण्यासाठी प्रयत्नशील राहिल याची काळजी घ्यावी.अशा सूचना अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी या बैठकीत उपस्थितांना दिल्या. हवेतील प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका क्षेत्रातील फटाक्यांची आतषबाजी सायं. ७ ते रात्री १० यावेळे करिता निर्धारित राहिल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

  महापालिका क्षेत्रात विशेषत: कचरा डंपिंग ग्राउंड वा उघडयावर कोठेही कचरा जाळण्यास पूर्ण बंदी असेल वा या बंदीचे उल्लंघन केल्यास कायदयाप्रमाणे दंड केला जाईल.त्याचप्रमाणे महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची संपू्र्ण जबाबदारी ही संबंधित प्रभागाचे सहा. आयुक्त यांची राहणार असून त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांची मदत घेवून धुळ प्रतिबंधक उपाययोजना परिणामकारकरित्या राबवावी व केलेल्या कारवाईचा अहवाल उपायुक्त पर्यावरण व कार्यकारी अभियंता पर्यावरण यांचेकडे सादर करावा असा आदेश महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी निर्गमित केला आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८